शिरपुंजे परिसरात पिकली चुटूकदार सेंद्रिय स्ट्राॅबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:43+5:302021-01-24T04:09:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : तालुक्यातील अतिदुर्गम शिरपुंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती? असे कुणी म्हणाले तर विश्वास बसणार नाही, मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : तालुक्यातील अतिदुर्गम शिरपुंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती? असे कुणी म्हणाले तर विश्वास बसणार नाही, मात्र हे सत्य आहे. येथील आदिवासी शेतकरी संजय बाळासाहेब धिंदळे व अकोले कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे यांनी हा यशस्वी प्रयोग राबवला आहे.
अकोले तालुक्यातील शिरपुंजे, पाचनई परिसर मुळा नदीच्या उगमाचा प्रदेश पावसाळ्यात दिवसाला पाच ते दहा इंच पाऊस पडतो. इथे भात, नागली ही खरिपाची तर हरभरा, मसूर रब्बीची कोरडवाहू पिके. इथे आजच्या यांत्रिक युगातही रेड्यांच्या सहाय्यानेच शेती? केली जाते.
शिरपुंजे गावातील जानाईवाडी ही दोनशे लोकवस्तीचे गाव. गावातील संजय बाळासाहेब धिंदळे यांच्याकडे मार्च महिन्यापर्यंत जेमतेम पाणी पुरले इतकी विहीर आहे, इथे पावसाळ्यात पर्यटक येतात. यातील पुणे जिल्ह्यात आळे (राजुरी) येथील पर्यटक शैलेश औटी यांनी धिंदळे यांना स्ट्रॉबेरी शेतीचा सल्ला दिला. औटी यांनी संजय धिंदळे यांना वाई (सातारा) येथील स्थानिक जातीची ५२५ स्ट्रॉबेरी रोपे दिली.
धिंदळे यांनी अकोले कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे यांच्या सल्ल्यानुसार ऑक्टोबर महिन्यात लागवड केली. बेडवर मल्चिंग कागद नसल्याने भाताचे तूस वापरले. साधे ड्रीप, शेणखत, शिजवून अंबवलेल्या गूळ भाताचे आळवणी, तर दशपर्णीचा एकच फवारणी केली. सध्या ८० दिवसांचे पीक झाले आहे. त्याला लाल चुटूक स्ट्रॉबेरी लगडल्या आहेत. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होईल. पर्यटकांना आता लुसलुशीत चुटूकदार स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार आहे, असे असे शेतकरी सांगतात.
.....
स्ट्रॉबेरी फक्त चित्रात पहिली. आपल्या शेतात येईल असे वाटलेच नव्हते. कृषी विभागाने मार्गदर्शन केले. यंदा दिडशे रुपये किलो भाव आहे, एका झाडाला वीस ते तीस लहानमोठी फळे आहेत. मी यंदा एकही फळ विकणार नाही. ती पै पाहुणे व गावातील लोकांना देणार आहे. यातून पुढील वर्षी अनेक शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड करतील.
-संजय धिंदळे, शेतकरी
....
स्ट्रॉबेरी पिकासाठी महाबळेश्वरच्या तुलनेत अकोले तालुक्यातील मुळा नदीच्या उगम भागाततील वातावरण आहे. धिंदळे यांनी कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी केला.
- भगवान वाकचौरे, कृषी पर्यवेक्षक
..
२३कोतूळ स्ट्रॅाबेरी.
....
ओळी : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम शिरपुंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती फुलली आहे. मध्यभागी शेतकरी संजय धिंदळे, डावीकडे कृषी पर्यवेक्षक भगवान वाकचौरे, कृषी सहायक सचिन साबळे.
.....