२७ आॅगस्टलाच होणार प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:21 PM2018-08-06T15:21:18+5:302018-08-06T15:21:48+5:30
डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे.
अहमदनगर : डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून आपला प्रभाग किती मोठा असेल, याचे आडाखे बांधले जात आहेत.
निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचनेचा कार्यक्रम गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आला होता. दि. ७ आॅगस्टपासून प्रभाग रचना कार्यक्रम होणार असल्याने शहरातील चित्र ७ आॅगस्टला होणार असल्याची शहरात चर्चा होती. ७ आॅगस्टला प्रभाग रचना अंतिम होणार असली तरी ती गोपनीय राहणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याची ७ आॅगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे तयार झालेली प्रभाग रचना १३ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून राज्य राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. १८ आॅगस्टला निवडणूक आयोग प्रस्तावाला मान्यता देणार असला तरी आरक्षण जाहीर करायचे असल्याने ती रचना गोपनीय राहील. २४ आॅगस्टला आरक्षण सोडत काढल्यानंतरच २७ आॅगस्टला प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत ती गोपनीय राहणार असल्याने इच्छकांना त्यांचे आडाखे २७ आॅगस्टनंतरच बांधता येणार आहेत.
आखाडी पार्ट्या
शहरात सध्या आगामी निवडणूक डोळ््यासमोर ठेवून आखाड पार्ट्या रंगल्या आहेत. इच्छुक, आजी, माजी नगरसेवकांकडून बोकडे कापली जात आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्हीही जेवणावळी रंगत आहेत. अनेकांच्या पार्ट्या पार पाडल्या असून ११ आॅगस्टरोजी आमावस्या आहे. त्यामुळे ८ ते ११ आॅगस्ट या काळात जत्रा, पार्ट्या रंगणार आहेत.