जमीन मोजणीसाठी खासगीकरणाचा पायलट प्रोजेक्ट; ३ ठेकेदारांची नियुक्ती
By साहेबराव नरसाळे | Published: April 7, 2023 05:18 PM2023-04-07T17:18:55+5:302023-04-07T17:19:28+5:30
२ महिन्यात मोजणी पूर्ण करणार, या सर्व प्रकरणांची मोजणी करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात मोजणीची ४ हजार ६३ प्रकरणे प्रलंबित आहेत. जमीन मोजणीसाठी शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे रोव्हरच्या माध्यमातून जमिन मोजणीसाठी ३ खासगी ठेकेदारांची नियुक्ती करुन दोन महिन्यात जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीनंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, विशेष पोलिस निरीक्षक बी. जी. शेखर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, भूमिअभीलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयीन प्रकरणे धरुन ४ हजार ६३ प्रकरणे प्रलंबीत आहेत.
यातील भूसंपादन व न्यायालयीन प्रकरणे वगळता ३ हजार ५१२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची मोजणी करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शासनाने महाटेंडरच्या संकेतस्थळावर टेंडर काढून मोनार्क सर्वेअर्स, राणे मॅनेजमेंट, शिदोरे इंजिनिअर्स या तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती केल्याचे विखे यांनी सांगितले.