पिंपळगाव जोगेचे पाणी मिळेना... कांदा सुकू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:21+5:302021-03-29T04:15:21+5:30
अळकुटी : पिंपळगाव जोगेच्या पाण्यासाठी पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभागाने दाद दिली नाही. त्यामुळे अळकुटी (ता. पारनेर) परिसरातील गावांमधील रबीचे ...
अळकुटी : पिंपळगाव जोगेच्या पाण्यासाठी पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभागाने दाद दिली नाही. त्यामुळे अळकुटी (ता. पारनेर) परिसरातील गावांमधील रबीचे मुख्य पीक असलेला कांदा सुकू लागला आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
ऐन हंगामात कांद्याला पिंपळगाव जोगेचे पाणी मिळाले नाही. त्याचा सर्वाधिक फटका पाडळी आळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येथील किसन नारायण थोरात यांचा दोन एकर, तर भाऊ लिंबाजी येवले यांचा एक एकर क्षेत्रावरील कांदा पाण्याविना जळून गेला आहे. ही प्रातिनिधिक नावे आहेत. अशी अवस्था अनेक शेतकऱ्यांची आहे. पाण्याअभावी अखेरच्या टप्प्यात असलेल्या कांद्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे.
१० फेब्रुवारीला पिंपळगाव जोगेचे आवर्तन सोडले होते; परंतु या आवर्तनाचे पाणी कळस, पाडळी आळे, अळकुटी, शेरी, रांधे, पाबळ, लोणी मावळा गावांना अत्यंत कमी प्रमाणात मिळाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही. पुणे जिल्ह्यातील बेल्हा परिसरात पाणी वळविण्यात आल्याने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके संकटात सापडली.
अळकुटी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन सोडणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
--
शेतकऱ्यांवर किती संकटे...
शेतकऱ्यांवर सध्या संकटांची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला. त्यानंतर रबी हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने तडाखा दिला. कोणत्याच पिकाला योग्य भाव नाही. महाविरण वीज बिल वसुलीसाठी वीज बंद करत आहे. कालव्याचे पाणीही वेळेवर मिळत नाही. बँकांची कर्जवसुली सुरू आहेच. त्यामुळे अशी आणखी किती संकटे शेतकऱ्यांवर येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
--
२८ अळकुटी कांदा
पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील पाण्याअभावी सुकून चाललेला कांदा.