पिंपळगाव माळवी तलावाची दैना फिटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:01+5:302021-02-17T04:26:01+5:30

पिंपळगाव माळवी : नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव माळवी येथील ऐतिहासिक तलाव यावर्षी मोठ्या पावसामुळे ओसंडून वाहिला. ...

Pimpalgaon Malvi Lake's misery | पिंपळगाव माळवी तलावाची दैना फिटेना

पिंपळगाव माळवी तलावाची दैना फिटेना

पिंपळगाव माळवी : नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव माळवी येथील ऐतिहासिक तलाव यावर्षी मोठ्या पावसामुळे ओसंडून वाहिला. त्यामुळे परिसरातील जनतेला आनंद झाला, परंतु या तलावाकडे महानगर पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या तलावाचे साधे जलपूजन देखील केले नाही.

ब्रिटिश काळात म्हणजे १९२० साली सीना नदीवर मोठा तलाव बांधून नगर शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात या तलावाचा मोठा हातभार लागला. या परिसरात नगरपालिकेची सातशे एकर जमीन असून या जमिनीची मालकी महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. आज तलाव पूर्ण भरलेला असून येथे आजही महानगरपालिकेचा एकही कर्मचारी उपलब्ध नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाचे नेते पिंपळगाव माळवी तलावाचे पर्यटन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन देतात व नंतर ते आश्वासन हवेतच विरून जाते.

या तलाव परिसरात सामाजिक वनीकरण विभागाने १९९२ साली सुंदर असे स्मृती उद्यान विकसित केले होते. त्यानंतर ते महानगरपालिकेच्या ताब्यात दिले. परंतु ते स्मृती उद्यान आज अखेरच्या घटका मोजत आहे.

मागील आठवड्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नगरविकास आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पिंपळगाव माळवी तलाव येथे ॲॅम्युझमेंट पार्कचा आराखडा तयार करण्याची सूचना केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्ह्यातील एकवीस गावांना सुंदर गाव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी नगर शहराला ऐतिहासिक वारसा असून पर्यटनाला वाव असल्याचे सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या आवाहनाला स्थानिक पदाधिकारी व विविध पक्षांचे नेते प्रतिसाद देतील काय? हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

....

सुशिक्षित बेकारांना रोजगाराच्या संधी

नगर शहरातील नागरिकांसाठी घटकाभर विरंगुळा म्हणून जवळपास कुठलेही पर्यटन केंद्र उपलब्ध नाही. पिंपळगाव माळवी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या ठिकाणी नौकानयन सुरू करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. या तलावापासून जवळच टेंभी खंडोबा हे ऐतिहासिक मंदिर आहे. डोंगरगण, मांजरसुंभा व गोरक्षनाथ गड अशीही जवळच धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. महानगरपालिकेने पिंपळगाव तलावाचा विकास केला तर शहरातील नागरिकांना जवळचे पर्यटनस्थळ उपलब्ध होईल. पंचक्रोशीतील सुशिक्षित बेकारांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. पिंपळगाव माळवी तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची राजकीय इच्छाशक्ती स्थानिक प्रशासन व राजकीय नेत्यांनी दाखवली तर जिल्ह्यातील हे आदर्श पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

...

Web Title: Pimpalgaon Malvi Lake's misery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.