‘निळवंडे’तून पिण्यासाठी आवर्तन
By Admin | Published: April 27, 2016 11:48 PM2016-04-27T23:48:18+5:302016-04-27T23:52:54+5:30
अकोले / राजूर : निळवंडे धरणातून बुधवारी दुपारी १२ वाजता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे.
अकोले / राजूर : निळवंडे धरणातून बुधवारी दुपारी १२ वाजता पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ६०० क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर पिक वॉलपर्यंत पाणी पोहचताच आवर्तन थांबवण्यात येणार आहे.
अकोले व संगमनेर तालुक्यासाठी हे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन असून तीन दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. दोन्ही तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या मंजूर पाणी पुरवठा योजना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आकस्मित पाणी पुरवठा योजनांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. आवर्तन काळात ३०० ते ३२५ दलघफू इतके पाणी वापरात येणार आहे. निळवंडे ते संगमनेर नदीकाठ भागात वीज पुरवठा १९ तास खंडित केला जणार आहे. तर पाच तास वीज सुरू राहणार आहे. प्रवरा नदी पात्रात कोरडे खाणडोह असल्याने पाणी संथ गतीने वाहण्याची शक्यता आहे. पाणी सोडतेवेळी निळवंडे धरणात ७११ दशलक्ष घनफूट तर भंडारदरा धरणात १ हजार ५६५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता़ भंडारदरा धरणातून अद्याप पाणी सोडलेले नाही, असे सहायक अभियंता जी. जी. थोरात यांनी सांगितले़
मुळा खोऱ्यातील बलठाण, कोथळे, घोटी, शेळवंडी या लघुपाटबंधारे प्रकल्पांतून आणि पिंपळगाव खांड या धरणातून पिण्यासाठी पहिले व शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ पिंपळगाव खांड धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे़ तर मुळा खोऱ्यातील सर्वच छोट्या धरणांनी तळ गाठला आहे़ त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे़ गुरुवारी दुपारपर्यंत मुळा खोऱ्यातील या प्रकल्पांमधून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे़