शहरातील उद्यानांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:14 AM2018-11-24T11:14:36+5:302018-11-24T11:16:36+5:30
बसायला बाकडे नाहीत, उद्यानातच मद्यपिंनी तयार केलेला दारुचा अड्डा, रिकाम्या बाटल्यांचा खच आणि महापालिकेच्याच उद्यान कर्मचाऱ्यांनी जाळलेला कचरा,
अहमदनगर : बसायला बाकडे नाहीत, उद्यानातच मद्यपिंनी तयार केलेला दारुचा अड्डा, रिकाम्या बाटल्यांचा खच आणि महापालिकेच्याच उद्यान कर्मचाऱ्यांनी जाळलेला कचरा, मोडलेले साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, अशी अनागोंदी आणि शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे़ शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने सुरु केलेल्या काही उद्यानांची शुक्रवारी ‘लोकमत’ने पाहणी केली़ त्यात ही दयनीय अवस्था आढळून आली़
सिद्धीबाग (देशपांडे उद्यान,निलक्रांतीचौक)
शहरातील दिल्लीगेट जवळील सिद्धी गार्डन अर्थात कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानात चार महिला व एक पुरुष असे पाच कर्मचारी नियुक्त केलेले आहेत़ मात्र, सर्वाधिक दुरावस्था याच उद्यानाची झालेली आहे़ या उद्यानात ठिकठिकाणी दारुंच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळला़ तर एका कोपºयात मोठ्या प्रमाणात कचरा जाळलेला आहे़ वास्तविक येथे कचरा जाळता येत नाही़ मात्र, या कर्मचाºयांनी महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी येत नसल्यामुळे तो जाळावा लागतो, असे सांगितले़ येथे झाडांना पाणी देण्याची व्यवस्था आहे़ पण पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे झाडांना पाणीही दिले जात नाही़ येथे येणाºया नागरिकांसाठी पिण्याचे पाणी नाही़ तसेच शौचालयाचीही व्यवस्था नाही़ त्यामुळे सर्वाधिक मोठी कुचंबना महिलांना सहन करावी लागते़ ठिकठिकाणी अस्ताव्यस्त बाकडे पडलेले आहेत़ तेथेच काही तरुण सिगारेटचा झुरका मारत बसतात तर काहीजण सायंकाळी दारुचे पेग रिचवत बसतात़ त्यामुळे हे उद्यान असून अडचण अन् नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे़ येथे सुरक्षारक्षकही नसतात़ त्यामुळे उनाडटप्पूंचे फावते, असे तेथे असलेल्या कर्मचाºयांनी सांगितले़
महालक्ष्मी उद्यान (भुतकरवाडी)
भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यान हे एकमेव बºयापैकी गार्डन आहे़ येथे रोज सायंकाळी शेकडो नागरिक फिरण्यासाठी येतात़ त्यांच्यासोबत लहान मुलेही असतात़ लहान मुलांसाठी ३ रुपये व मोठ्या माणसांसाठी ५ रुपये असे तिकीट दर आकारले जाते़ या उद्यानात महापालिकेच्या गार्डन विभागाचे कार्यालय आहे़ हे कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत़ त्या बसविण्यासाठी महापालिकेकडे निधी शिल्लक नाही़ लहान मुले जेथे खेळतात, तेथे खड्डे पडलेले आहेत़ या उद्यानाची शान असलेला कारंजा गेल्या महिन्यापासून बंद आहे़ या उद्यानात महिलांची संख्या मोठी आहे़ मात्र, पुरेसा विद्युत प्रकाश नसल्यामुळे महिलांना सायंकाळी सातनंतर उद्यानात थांबण्याची भीती वाटते़
गंगा उद्यान (मिस्कीन मळा)
गंगा उद्यान हेदेखील चांगले उद्यान आहे़ या उद्यानात जाण्यासाठी २ रुपये व ५ रुपये तिकीट आकारले जाते़ या उद्यानात सायंकाळी मोठी गर्दी होते़ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थीत जागा, मुलांसाठी खेळण्या आहेत़ पण काही खेळण्या तुटलेल्या आहेत़ महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था आहे़ चहूबाजूंनी बंदिस्त असल्यामुळे या मैदानात प्रवेशद्वाराशिवाय आत जाता येत नाही़ रात्रीच्यावेळी प्रवेशद्वार बंद असते़ येथे चार कर्मचारी असून, एक महिला, एक माळी कामगार व दोन सुरक्षारक्षक तैनात असतात़ ते उद्यानाची चांगली देखभाल ठेवतात़ पण काही भागात अपुरी प्रकाश व्यवस्था आहे़