नगर-सोलापूर रस्त्यावर पुन्हा खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:00+5:302021-09-13T04:21:00+5:30
रूईछत्तीसी : नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे अस्तरीकणातून गेल्या काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ...
रूईछत्तीसी : नगर-सोलापूर रस्त्यावरील खड्डे अस्तरीकणातून गेल्या काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
नगर-सोलापूर महामार्गाचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे हस्तांतरण करण्यात आले. परिणामी रस्ते वाहतूक विभागाने रस्त्याचे अस्तरीकरण करण्यावर मोठा भर दिला. कामाची गुणवत्ता चांगली वाटत होती. परंतु, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. मध्यंतरीच्या काळात रस्त्याचे अस्तरीकरण झाल्याने रस्त्याच्या बाबतीत सकारात्मकता निर्माण झाली होती. सध्या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. प्रवाशांना पाण्यामुळे खड्डा दिसत नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. कित्येक प्रवाशांचा प्रवास करत असताना मृत्यू झाला आहे. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळकी मार्गे प्रवाशांना नगरला जावे लागत असल्याने या स्थानिक रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.
नगर-सोलापूर महामार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रूईछत्तीसी येथून जातो. त्यामुळे गावातील रस्त्याचे दर्जेदार काम करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दररोज एक अपघात या रस्त्यावर पहायला मिळतो. अनेकांचे सामान्य घरातील प्रपंच या रस्त्याच्या अवस्थेमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकवेळा आंदोलने करूनही या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे. पंढरपूरला जोडणारा हा मार्ग कधी दर्जेदार होणार याची उत्सुकता नागरिकांना आहे.
---
रस्त्याचे भूसंपादन सुरू आहे. काम गुणवत्तापूर्ण होणार असल्याने कामास थोडा वेळ लागेल. भूसंपादन करण्यास थोडा विलंब होत असल्याने काम लांबणीवर पडत आहे.
-पी. बी. दिवाण,
परियोजना निदेशक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.
----
गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता निकृष्ट झाला आहे. वेळोवेळी प्रशासनास जाग आणूनही हा प्रश्न मार्गी लागत नाही. अनेकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. दवाखान्यात मोठा खर्च आला आहे. लवकर काम मार्गी लागले नाही तर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.
-रमेश भांबरे,
अध्यक्ष, बारा गाव कृती समिती, रूईछत्तीसी
---
१२ सोलापूर रोड
अस्तरीकरणानंतर अल्पावधीतच नगर-सोलापूर रस्त्यावर पडलेले खड्डे.