जवळे-निघोज-देवीभोयरे फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:01+5:302021-09-23T04:23:01+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे-निघोज-देवीभोयरे फाटा रस्त्याची काम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यातच दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने ...
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे-निघोज-देवीभोयरे फाटा रस्त्याची काम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यातच दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेंतर्गत राळेगण थेरपाळ ते बेल्हा ३९ किलोमीटरसाठी १६ कोटी ३६ लाख रूपये निधी मंजूर झाला. ३० सप्टेंबर २०२० रोजी रस्त्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आली होते. रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत अनेक ठिकाणी रस्ता खचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य सुरू झाला आहे. आठ दिवसांपूर्वीच देवीभोयरे फाटा ते निघोज दरम्यान दत्ता घाडगे यांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचे वाहन उलटले होते. ते थोडक्यात बचावले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता काम पूर्ण होण्यापूर्वीच पाईपलाईनसाठी खोदकाम केले होते. आता रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर अशा काही ठिकाणी रस्ता खच असल्याचे दिसते. अनेकांनी रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतरही तो खोदल्याने ही खचला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वेळा ठेकेदाराने सूचनाही दिल्या होत्या. परंतु, सूचनांचे पालन न करता रस्ता खोदणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
--
रातोरात रस्ता खोदणे किंवा खराब करणे हा काही पराक्रम नसून एक प्रकारे आपणच आपल्या पैशाची उधळपट्टी करत आहोत. रस्त्याचे काम सुरू असताना किंवा झाल्यानंतर जेव्हा आपल्याला गरज असेल त्यावेळेस शासकीय पावती फाडून रस्ता खोदणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तो खड्डा पुन्हा भरून रस्ता पूर्ववत करू शकते. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
-रामदास घावटे,
सामाजिक कार्यकर्ते
----
२२ देवीभोयरे फाटा
जवळे-निघोज-देवीभोयरे फाटा रस्त्यावर ठिकठिकाणी अशा प्रकारे खड्डे पडले आहेत.