खाली खड्डे, वर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:09+5:302021-09-22T04:25:09+5:30

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नगरकरांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पथदिवे ...

Pits below, darkness above | खाली खड्डे, वर अंधार

खाली खड्डे, वर अंधार

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नगरकरांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पथदिवे बंद असल्याने अंधाराची भर पडली आहे. रस्त्यावरील पथदिवे, चौकांतील सिग्नल, गल्लीतील विद्युत दिवे बंद आहेत. त्यामुळे खाली खड्डे आणि वर अंधार, अशी परिस्थिती मंगळवारी सायंकाळी संपूर्ण नगर शहरात पाहायला मिळाली.

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. मार्च ते एप्रिल या काळात संपूर्ण लॉकडाऊन होता. या काळात रस्ते मजबुतीकरणासह खड्डे बुजविण्याची संधी होती. विनाअडथळा रस्त्यांची दुरुस्ती करता आली असती. मात्र, या काळात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हातावर हात धरून बसले होते, अशा तक्रारी आता नागरिक करीत आहेत.

विशेष करून, नगर-मनमाड रोड, पत्रकार चौक ते डीएसपी चौक, औरंगाबाद रोडवरील महापालिका ते वसंत टेकडी, पत्रकार चौक ते दिल्लीगेट, अमरधाम रोड, कल्याण रोड, सक्कर चौक ते मार्केट यार्ड चौक, दिल्लीगेट ते जुनी महापालिका रोड, जुना पिंपळगाव रोड, गुलमोहोर रोड, माळीवाडा ते मिरवणूक मार्ग अशा सर्वच रस्त्यांवर अंधार होता.

प्रशासकीय प्रमुख आयुक्त शंकर गोरे यांनी भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यात घसरून अनेक जण जखमी झाले. काही जण खड्ड्यात पडले. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खड्डेमुक्त नगर करण्याची घोषणा महापालिकेतील महाविकास आघाडीने केली खरी, पण त्या दिशेने पावले टाकली गेली नाहीत. त्यामुळे पावसाळा सुरू होताच, नगरकरांचे कंबरडे मोडले. रस्त्यावर प्रकाश असता, तर किमान खड्डे तरी दिसले असते, पण इथे तीही सोय नाही. त्यामुळे वाहनांच्या प्रकाशात नागरिकांना मार्ग शोधावा लागत आहे.

---

स्मार्ट एलईडीसाठी अंधार

रस्त्यांवरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. स्मार्ट एलईडी प्रकल्प येणार येणार म्हणून बंद पडलेले पथदिवे दुरुस्तच करण्यात आले नाहीत. दोन महिने उलटून गेले, पण स्मार्ट एलईडी प्रकाश पडला नाही. उलटपक्षी खड्डे पडलेल्या रस्त्यावरील प्रकाश गायब झाला. त्यामुळे अंधारात चाचपडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

---------

कराच्या पैशातून ठेकेदाराची बिले

महापालिकेकडून सक्तीने करवसुली केली जाते. कर रूपाने जमा होणाऱ्या पैशातून पायाभूत सुविधा न पुरविता ठेकेदारांची बिले अदा केली जातात. कराचे पैसे जमा होण्याआधी लेखा विभागात ठेकेदारांची हातभर यादी तयार असते. त्यामुळे खड्डे बुजविणारे आणि विद्युत साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदारांचे बिल देण्यासाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. काम केल्याचे पैसे वेळवर मिळत नसतील, तर काम करायचे कशासाठी, असा ठेकेदारांचा प्रश्न आहे. खड्डे बुजविण्यासाठी दोन महिने ठेकेदारच मिळाला नाही. म्हणून खड्डे बुजवायला सप्टेंबर महिना उजडला.

....

Web Title: Pits below, darkness above

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.