कुकडीच्या आराखड्यात साकळाईचा समावेश नाही; अहवाल तयार करण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:31 PM2020-03-15T12:31:58+5:302020-03-15T12:32:29+5:30
कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पंरतु त्यात श्रीगोंदा, नगर तालुक्यांसाठी वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद नाही़. तसेच या प्रकल्पात साकळाई योजनेचा समावेशही करण्यात आलेला नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
अहमदनगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पंरतु त्यात श्रीगोंदा, नगर तालुक्यांसाठी वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी तरतूद नाही़. तसेच या प्रकल्पात साकळाई योजनेचा समावेशही करण्यात आलेला नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आमदार बबनराव पाचपुते यांनी विधानसभेत कुकडी पाटबंधारे प्रकल्पात साकळाई उपसा सिंचन योजनेचा समावेश करण्यात आला आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. पाचपुते यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पाटील म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाच्या २०१८ च्या निर्णयानुसार सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ९४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी २०१९-२० मध्ये ४० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून डिंभे, माणिकडोह बोगद्याचे सर्र्वेक्षण व संकल्पन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे साकळाई योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
समुद्राकडे जाणारे पाणी कुकडीत वळविणार
कुकडी प्रकल्पापासून पश्चिम घाटमार्गे कोकणातून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी कुकडी प्रकल्प व इंद्रायणी खो-यात वळविण्याच्या प्रस्तावास सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नाशिक येथील मुख्य अभियंत्यांच्या पाणी उपलब्धता अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
योजनेचा प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार करुन त्यास मान्यता घेतल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर हे अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.