गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:06+5:302021-01-04T04:19:06+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्व ...
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज भरून घेतले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत चार जानेवारी असून, अर्ज दाखल केल्यापासूनच निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत.
पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील पिंपळगाव, मांजरसुंबा, डोंगरगण, जेऊर या गावातदेखील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे .गावपुढारी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असून कुणाला रामराम, कुणाला सलाम, कुणाला जय महाराष्ट्र असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न समारंभ, दशक्रिया विधी, मुंज, देव देव, कुणी आजारी पडले की, त्या ठिकाणी हजेरी, कुणाचे वाढदिवस, घरगुती कार्यक्रम असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वाढवता येईल, त्यादृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. पिंपळगाव पंचक्रोशीत राजकीय विचार केला तर ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकाप्रमाणे ढीगभर नेते आहेत. भावकी, सोयरे धायरे या सर्व गोष्टींनाच उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले असल्याचे चित्र दिसत आहे.