आईची रक्षा शेतात टाकून केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:44 AM2018-05-26T11:44:28+5:302018-05-26T11:44:41+5:30
नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.
यमन पुलाटे
लोणी : आज नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.
स्व.हौसाबाई मोहिनीराज तांबे यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा ही विसर्जित करण्याऐवजी किंवा नदीत सोडण्याऐवजी ती शेतात विसर्जन करण्याचा संकल्प कानिफनाथ तांबे यांनी केला होता. त्यावर बंधू शिवनाथ तांबे, सुनील तांबे, मामा दिगंबर चव्हाण, मेव्हणे बाबासाहेब दरेकर, बहिणी लिलाबाई गवांदे, मंदा ताके, नंदा दरेकर, भाचे संतोष गवांदे, राहुल घोगरे, रामेश्वर पानसरे, शांताराम मोरे, चैतन्यकुमार तांबे, तेजस्विनी तांबे, अभयसिंह तांबे व उदयसिंह तांबे, उर्मिला तांबे, रोहिणी तांबे, संतोष वाणी यांच्यासमोर मांडला. त्यांनी देखील होकार दिला. उपस्थितांना पुष्प देवून जगद्गुरू तुकोबांच्या गाथेतील अभंग म्हटले व तद्नंतर जिजाऊ वंदना म्हणून अस्थी विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी तांबे, बेबी चिंधे, बाळासाहेब पाळंदे, चणेगावचे पोलीस पाटील लोहाळे, राम भोसले, शैला थोरात, भास्कर ढमक, चंद्रकला दिघे, शोभा गोळे, नानासाहेब तांबे, जॉन पाळंदे, बाळासाहेब साळवे उपस्थित होते.
‘लोकमत’मधील लेखाची प्रेरणा
आपल्या घरातील माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी जतन झाल्या पाहिजे, यासाठी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीमध्ये ‘लोकमत’चे आवृृत्ती प्रमुख सुधीर लंके यांचा ‘अस्थिंची फुले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता़ हा लेख मनात घर करुन गेला. त्यातून आम्ही प्रेरणा घेतली़ सावरगावतळ या गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे. माझा कर्मकाडांवर विश्वास नाही़ त्यामुळे दशक्रिया विधीत चांगला पायंडा पडावा म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे, असे कानिफनाथ तांबे यांनी सांगितले.