प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:24+5:302021-03-18T04:19:24+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही रेल्वेस्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर वाढवण्यात आला. मात्र अहमदनगर रेल्वे स्थानकावर ...
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही रेल्वेस्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर वाढवण्यात आला. मात्र अहमदनगर रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
सद्यस्थितीत रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्मवर प्रवेश करण्यासाठी १० रुपये मोजावे लागतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. दर वाढले नसले तरी रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या भीतीमुळे गर्दी होत नाही. अनेकजण नातेवाईक किंवा मित्राला स्टेशनच्या बाहेर सोडून माघारी फिरतात. सद्यस्थितीत अहमदनगर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे आपोआपच गर्दी कमी झाली आहे. सद्यस्थितीत लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वे सुरू आहेत. त्यामुळे आगाऊ बुकिंग करून प्रवासी प्रवास करत आहेत. सध्या अहमदनगर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या ५ ते १० रेल्वे थांबतात. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगवेगळी आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटे दररोज कमी-जास्त विकली जातात. त्यामुळे अशा तिकिटांची संख्या सारखी नसते. कोरोनामुळे ज्यांना प्रवास करावयाचा अशांचीच गर्दी स्टेशनवर असते. याशिवाय त्यांच्यासमवेत विनाकारण आलेल्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटे कमी विकली जातात.
दुहेरीकरणाच्या कामाला वेग
मनमाड- दौंड या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. रेल्वेची संख्या वाढल्याने दुहेरीकरणाशिवाय दुसरा पर्याय रेल्वेकडे उपलब्ध नव्हता. मनमाडकडून अहमदनगर पर्यंत बहुतांशी काम पूर्णत्वाकडे आहे.
प्रतिक्रिया -
मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो होतो. गेल्या वर्षभरापासून रेल्वे स्टेशनकडे फिरकलो देखील नाही. कोरोनाची काळजी घेऊनच स्टेशनवर आलो. त्याला स्टेशनवर सोडून परत निघालो आहे.
- संपत कोळेकर
.................
प्रतिक्रिया -
सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर १० रुपये आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत पॅसेजर रेल्वे बंद आहेत. त्या वगळता लांब पल्ल्याच्या सर्व ट्रेन सुरू आहेत. सध्या प्रवाशांची संख्या घटलेली आहे.
- एन.पी. तोमर, स्टेशन मास्तर