अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

By साहेबराव नरसाळे | Published: September 15, 2018 11:08 AM2018-09-15T11:08:42+5:302018-09-15T11:15:31+5:30

ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.

'Play India' by barefoot | अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : ना पायात शूज,  ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.
जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शुक्रवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात झाल्या. धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, अडथळ्यांची शर्यत अशा स्पर्धांमुळे वाडिया पार्क खेळाडूंनी गजबले होते. जिल्हाभरातून सुमारे ६५० खेळाडू वाडिया पार्कमध्ये दाखल झाले होते. मात्र, शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन वाडिया पार्क क्रीडा संकुलात दाखल झालेल्या खेळाडूंसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.  खेळाडूंच्या जेवणाचीही व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. जेथे जागा मिळेल तेथेच बसून मुले आईने दिलेला डबा उघडून खात होते. कोरड्या भाजीबरोबर भाकरी तर काहींच्या डब्यामध्ये भाजीही नव्हती. आपल्या संघासाठी, शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारी ही मुले कोरड्या भाकरी पोटात ढकलून मैदानात जीव तोडून खेळत होती.
प्रारंभी मैदानात पाण्याची व्यवस्था केली. मात्र, ते पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी आणण्याची तसदीही कोणी घेतली नाही. जेवायचे म्हटले तरी मुलांना बाहेर जाऊन पाण्याची बाटली आणावी लागत होती. काही मुले घरातून भल्या सकाळीच बाहेर पडली होती. त्यांना डबाही देण्यात आला नव्हता. अशा मुलांनी वाडिया पार्कमध्ये भेळीवरच भूक भागवून मैदान मारले. कोणत्याही स्पर्धेत उतरण्यापूर्वी खेळाडूकडे खेळाच्या पूर्ण सुविधा असल्या पाहिजेत. पण येथे अनेक खेळाडूंच्या पायात साधे बूटही नव्हते. धावताना, उंच उडी मारताना पाया-पोटात गोळा आला तरी त्यावर उपचाराची व्यवस्था नव्हती. अनवाणी धावणाऱ्या एका मुलाला काटा मोडला तर त्याला ट्रॅक सोडावा लागला. कर्जतचा एक मुलगा पायात क्रॅम्प आला म्हणून विव्हळत होता. पण खेळाडूंची साधी कोणाला दखल घ्यावीशी वाटली नाही.
स्पर्धेच्या नियोजनासाठी १५ हजार निधी
जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तरतूद नाही. अनेक मुले लांबून येतात. त्यांचा सर्व खर्च हौशी पालक करतात. अनेक शाळांकडेही खेळासाठी निधी नसतो. त्यामुळे मुलांकडूनच पैसे गोळा करुन त्यांना आणले जाते. पूर्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी अडीच हजार रुपये मिळत होते. आता १५ हजार रुपये मिळत आहेत. त्यातून पंचांच्या चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.

Web Title: 'Play India' by barefoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.