दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:36 PM2019-05-30T12:36:50+5:302019-05-30T12:37:03+5:30
२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला.
संगमनेर : २००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. गावांमध्ये कुणीही टॅँकरचे राजकारण करू नये. दुष्काळी गावांना पाणी देण्याची महत्वाची भूमिका तलाठी, ग्रामसेवक यांची आहे. त्यांनी नियुक्ती केलेल्या ठिकाणी त्यांनी राहणे गरजेचे आहे, असे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले.
संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवानातील सभागृहात बुधवारी आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत लोखंडे बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश घुगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, शरद थोरात, गुलाब भोसले, जयवंत पवार, आप्पा केसेकर, संजय फड, अरुण इथापे, साहेबराव वलवे, बुवाजी खेमनर, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे यांसह नागरिक उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करावा, यासाठी काकडवाडी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, भीषण पाणी टंचाई असूनही तो सुरू झाला नाही. पारेगाव येथे तलाठी नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तेथे तलाठ्याची नेमणूक करावी. अशी मागणी त्यांनी केली.
‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनची दखल
‘टॅँकर गेले कुण्या गावा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने एकाच दिवशी जिल्ह्यातील ५० गावांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर यांनी या आढावा बैठकीत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमुळेच प्रशासन जागे झाले असल्याचे सांगितले. या वृत्ताची प्रशासनाला दखल घ्यावी लागली असल्याचे आहेर म्हणाले. तसेच इतरांनी देखील या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले.
अवैध वाळू उत्खनन, कत्तलखाने बंद करा
बैठकीत पाणी टंचाईबरोबरच अवैध वाळू उत्खनन व शहरातील अवैध कत्तलखाना आदी प्रश्न उपस्थितांनी मांडले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्रातील विहिरींची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपस्थित असलेल्या अनेकांनी बोलून दाखविले. तर शहरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. येथील रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले गेल्याने सुकेवाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीत ते उतरल्याचे सुकेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन व कत्तलखाने बंद व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.