PM Modi in Shirdi: साईबाबांच्या शिर्डीला भेट देऊन कसं वाटलं; वाचा खुद्द मोदींच्या शब्दांत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:41 AM2018-10-19T11:41:26+5:302018-10-19T11:43:48+5:30
पंतप्रधान मोदी साईंच्या चरणी लीन
शिर्डी: साई समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साई समाधीचं दर्शन घेतलं. पंतप्रधानांनी मंत्रोच्चारांच्या गजरात साईंच्या पादुकांचं पूजनदेखील केलं. साईबाबांच्या चरणी लीन झालेल्या मोदींनी मनोभावे आरतीही केली आणि समाधीवर चादर चढवली. त्यांच्यासोबत राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निवासाची चावी देण्यात येणार आहे. या सोहळ्याआधी मोदींनी साईबाबा मंदिरात असलेल्या अभिप्राय पुस्तकात त्यांच्या भावना लिहिल्या. 'श्रीसाईबाबांच्या दर्शनानं मनाला शांतता मिळाली. श्रीसाईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भुत स्वरुप पाहायला मिळतं. सर्व पंथांचे लोक श्रीसाईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता, श्रीसाईबाबांचा सबका मालिक एक है हा संदेश जगाच्या शांततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्व साईभक्तांना श्रीसाईबाबांचा आशीर्वाद मिळू दे. त्यांना सुख आणि शांतता मिळू दे, अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा साईंच्या चरणी नतमस्तक होतो,' असा अभिप्राय मोदींनी पुस्तिकेत नोंदवला.