दैवदैठणच्या कलाकाराचे पंतप्रधानांकडून कौतुक; संसद, भारतमाता, भारतीय सेना यांचे चित्र मोदी यांना दिले भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:47 PM2018-01-22T18:47:26+5:302018-01-22T18:47:40+5:30
‘दंडवतेजी, आपकी कला बहुत सुंदर और रचनात्मक है।’ असे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांची गळाभेट घेतली.
संदीप घावटे
देवदैठण : ‘दंडवतेजी, आपकी कला बहुत सुंदर और रचनात्मक है।’ असे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांची गळाभेट घेतली.
देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी व संतश्रेष्ठ निंबराज महाराज यांचे वंशज मात्र नोकरीनिमित्त अहमदनगर येथे स्थायिक झालेले भाजपाचे शहर जिल्हा सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष व शिल्पकार हेमंत दंडवते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॉलपेनने चित्र रेखाटून दिल्ली येथे संसदमधे पंतप्रधानांना भेट दिले. आपलेच हुबेहुब चित्र पाहून आश्चर्यचकित होत मोदी यांनी कलाकार दंडवते यांच्या पाठीवर थाप टाकत कौतुक केले.
खा. दिलीप गांधी यांच्या माध्यमातून दंडवते यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मोदी यांच्या व्यक्तिचित्रासह मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती, तसेच संसद, भारतमाता, भारतीय सेना आदी विषयांची रचनात्मक मांडणी केलेले चित्र मोदी यांना भेट दिले. चित्र पाहून दंडवते यांचे कौतुक करून मोदींनी गळाभेट घेतली. त्यानंतर दहा मिनिटे दंडवते यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करताना त्यांच्या कामाची माहिती त्यांचे मुलांसाठीचे समाजकार्य व कलाशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर दंडवते हे मोदींचे दर्शन घेण्यासाठी झुकले असता ‘नही, दर्शन मेरा नही; ईश्वर का लेने का!’ असे म्हणत त्यांचे हात धरले. त्यावर दंडवते यांनी ‘आपके दर्शन पाकर हम धन्य हो गये!’ अशी नम्र भावना व्यक्त केली.
पंतप्रधानांशी बोलताना खा. दिलीप गांधी यांनी दंडवते एक अष्टपैलू कलाकार असून, त्यांच्या कलेत नावीन्य, कल्पकता व विशेषत: सामाजिक भावना असते. त्यामुळे कला जगतात अहमदनगरचे नाव उंचावले असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साधेपणा व आपले केलेले आदरातिथ्य आपणास विशेष भावले असून, पंतप्रधानांकडून माझ्या कलेला मिळालेली दाद माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे.
-हेमंत दंडवते, कलाकार.