पारनेरच्या शास्त्रज्ञाने बनवले रक्ताच्या गाठी रोखण्याचे औषध
By Admin | Published: April 9, 2017 05:30 PM2017-04-09T17:30:44+5:302017-04-09T17:30:44+5:30
हृदयातील रकतवाहिन्याच ब्लॉक होऊ नये, यासाठी पारनेर तालुक्यातील किन्ही येथील शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी औषध शोधले आहे.
आॅनलाईन लोकमत
विनोद गोळे / पारनेर (अहमदनगर), दि़ ९-
सध्या सर्वसामान्यांना हृदयविकाराचा त्रास वाढला असून, हृदयातील रक्तवाहिन्या ब्लॉकहोत असल्याने आजारपण बळावते. यामुळे बायपास किंवा अॅन्जिओग्राफीही करावी लागते़ मात्र, हृदयातील रकतवाहिन्याच ब्लॉक होऊ नये, यासाठी पारनेर तालुक्यातील किन्ही येथील शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी औषध शोधले आहे. अमेरिकेतील जागतिक स्तरावरील हाफकिन संशोधन संस्थेत आता त्यावर संशोधन सुरू असून, दोन वर्षांत त्याचा लाभ सामान्यांना मिळू शकतो़ साध्या गवंड्याच्या मुलाने ही अत्युच्य कामगिरी केली आहे़
पारनेर तालुक्यातील किन्ही या गावचे विनायक खोडदे यांचे वडील शहाजी गावात गवंडी काम, तर आई ताराबाई शेती करतात़ शहाजी यांनी गवंडी काम करून मुलगा विनायकचे शिक्षण पूर्ण केले़ विनायक यांनी किन्ही येथील प्राथमिक व ओंकारबाबा माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले़ न्यू इंग्लिश स्कूल पारनेरमध्ये बारावीपर्यंत व पारनेर महाविद्यालयात रसायनशास्त्रात बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे रसायनशास्त्रातच एम़एस्सी़ केली़ विनायक यांचे संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवणार असल्याचे लक्षात येताच पुणे येथील भारतीय औषध संशोधन केंद्रात आयसर येथे शास्त्रज्ञ म्हणून नेमणूकही झाली़
सन २०११ पासून तेथे काम करताना महिलांना गर्भपिशव्यांना होणारा कॅन्सरवरील औषध शोधण्याचे त्यांनी संशोधन सुरू केले़ सुमारे पाच वर्षांनतर त्यात त्यांना यश येऊन त्याची दखल केंद्र सरकारने घेतली़ त्यांच्या कार्याला त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी साथ देताना संशोधनात मदत करीत आहेत़ सहा महिन्यांपूर्वी त्यांना जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन केंद्र असणारे अमेरिकेतील जॉन हाफकिन औषध संशोधन संस्थेत भारताचे शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली़ विशेष म्हणजे देशभरातून फक्त ते एकमेव शास्त्रज्ञ म्हणून त्यांची यंदा निवड झाली आहे़
हृदयविकार दूर होण्यासाठीच संशोधन
शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी ग्रामीण भागासह देशभरात,जगभरात हृदयविकाराचा त्रास वाढला असल्याचे त्यांना अनेक पाहणी अहवालानंतर लक्षात आले़ विनायक यांनी हृदयविकार होतोच कसा, याची माहिती घेतल्यावर हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होत असल्याने रक्ताचा पुरवठा थांबतो व त्यातून माणसाला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात, असे लक्षात आले़ म्हणून विनायक यांनी हृदयातील रक्तवाहिन्या गोठूच नये, तेथील रक्तपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी औषध तयार केले आहे़ आता सध्या ते जागतिक औषध संशोधन केंद्र जान हाफकिन संस्था, अमेरिका येथे त्या औषधाचा किती परिणाम कसा होतो, त्याचा उपयोग कशा पद्धतीने होईल, यावर संशोधन करीत आहेत़ दोन वर्षांत यावर संशोधन पूर्ण होणार आहे़ या संशोधनाचा सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे़