इमारतींच्या नोंदी ठरणार कळीचा मुद्दा :श्रीराम मंदिर भूखंड घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:08 PM2018-11-14T16:08:30+5:302018-11-14T16:08:50+5:30
शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या चौकशीच्या दर्जाबाबतच शंका निर्माण झाल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वादात सापडण्याची शक्यता आहे.
अहमदनगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या चौकशीच्या दर्जाबाबतच शंका निर्माण झाल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वादात सापडण्याची शक्यता आहे. धर्मादायचे अधिकारी जाणीवपूर्वक विश्वस्तांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही याप्रकरणी सुरु झाला आहे.
श्रीराम मंदिर ट्रस्टने ३१ एकर इनाम जमिनीपैकी काही भूखंड भाडेकराराने दिलेले आहेत. ही शेतजमीन असताना तिचा बिगरशेती व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यात आला. या भूखंडावर व्यापारी फर्म तसेच परमीट रुम उभे राहिले आहेत. विश्वस्तांनी यातील ५१ भाडेकरार हे तीन वर्षाच्या मुदतीचे केले आहेत. या भाडेकरारांची यादी चौकशी निरीक्षक ज्ञा. शि. आंधळे यांनी आपल्या चौकशी अहवालात जोडलेली आहे. सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. बी. घाडगे यांच्या चौकशी अहवालातही ही यादी आहे. या यादीत प्रत्येक भाडेकरुला देण्यात आलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ व त्यासोबत असणाऱ्या बांधकामाचे क्षेत्र याचा उल्लेख आहे.
भूखंड तीन वर्षासाठी भाडेकराराने देताना विश्वस्तांकडे हे बांधकाम आले कोठून? हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तरही या अहवालातच आहे. आम्ही भाडेकरुंना भूखंड दिले. त्यावर त्यांनी स्वत:च्या खर्चाने व्यवसायासाठी बांधकाम केले. तीन वर्षाचा भाडेकरार संपल्यानंतर आम्ही ते भूखंड बांधकामासह ताब्यात घेतले व पुढील भाडेकरुला दिले, अशी बाब विश्वस्तांनीच आपल्या जबाबात नमूद केली आहे.
भाडेकरुंना बांधकाम करण्याची मुभा विश्वस्तांनी कोणत्या अधिकारात दिली व हे बांधकाम अधिकृत आहे का? असे प्रश्न विश्वस्तांच्या या जबाबातूनच निर्माण होतात. मात्र, चौकशी निरीक्षक आंधळे यांनी याबाबत काहीही आक्षेप उपस्थित केले नाहीत. घाडगे यांनीही याकडे पूर्णत: दुर्लक्ष करुन देवस्थानबाबतची तक्रारच दप्तरी दाखल करण्याचा आदेश केला. त्यामुळे या दोन्ही अधिकाºयांनी केलेल्या कार्यवाहीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धर्मादाय आयुक्तांनी फेरचौकशीचा आदेश दिला. मात्र, पूर्वीची चौकशी योग्य पद्धतीने का झाली नाही? हा प्रश्न आता समोर आला आहे.
विश्वस्तांनी बांधकामाबाबत बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दाखल करणे आवश्यक वाटते, असे मत आंधळे यांनी चौकशी अहवालात नोंदविले आहे. याचा अर्थ या कार्यालयाला ट्रस्टने बांधकामांबाबत आजवर काहीही कळविलेले नाही. तरीही ट्रस्टचे कामकाज नियमानुसार सुरु आहे, असे सांगून चौकशी गुंडाळण्यात आली.
द्विसदस्यीय समिती नेमणे शक्य
श्रीराम मंदिराबाबत चौकशी निरीक्षक ज्ञा. शि. आंधळे यांनी केलेल्या चौकशीबाबत आक्षेप असतानाही पुन्हा त्यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली याकडे धर्मादाय उपआयुक्त हि.का. शेळके यांचे लक्ष वेधले असता, याबाबत द्विसदस्यीय समिती नियुक्त करता येऊ शकेल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आंधळे हे नगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असल्याने त्यातून चौकशी प्रभावित होऊ शकते, असाही प्रश्न आहे.