राहुरी तालुक्यात ३५ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:15+5:302021-01-04T04:19:15+5:30
टाकळीमिया येथे लग्नसोहळा रविवारी (दि.०३) पार पडला. दुपारी जेवणानंतर तासाभराने काहींना पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे, चक्कर ...
टाकळीमिया येथे लग्नसोहळा रविवारी (दि.०३) पार पडला. दुपारी जेवणानंतर तासाभराने काहींना पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे, चक्कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या. ही विषबाधा असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने धावपळ उडाली. रुग्णांना तातडीने विवेकानंद नर्सिंग होममध्ये हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कडू यांनी हे रुग्ण अन्नातून विषबाधा असल्याचे सांगितले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे. विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल झालेल्यांपैकी अत्यवस्थ अवस्थेतील दोघांना लोणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. राहुरीतील ग्रामीण रुग्णालय,देवळाली प्रवरा येथेही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांच्या जेवणात दुधाची रबडी ही मिठाई होती.
............
रबडी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या सुमारे शंभरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. विषबाधा झालेल्यांपैकी ३५ ते ३६ जणांना विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.
- डॉ. विलास कडू, विवेकानंद नर्सिंग होम