कोपरगावमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश : पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:31 PM2018-12-27T18:31:53+5:302018-12-27T18:31:56+5:30
भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
कोपरगाव : भोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी, धागेदोरे, धूूप, अंगारा देवून अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी मुर्शतपूर (ता. कोपरगाव) येथील म्हसोबानगर येथून शिवा प्रकाश भालेराव या भोंदूबाबाला अटक केली आहे. याप्रकरणी उद्धव अशोक काळापहाड (रा. साईनगर तपोवन रोड, अहमदनगर) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीची बहीण पुष्पा हिचे सासरे तुकाराम यांना विचित्र स्वप्न पडत होते. त्यामुळे ते म्हसोबानगर मुर्शतपूर येथील भोंदूबाबा शिवाप्रकाश भालेराव याच्याकडे नियमितपणे जात असत. त्यानंतर मेव्हणे अनिल यांच्या पोटात दुखू लागले. बहिणीचे सासरे तुकाराम यांनी मेव्हणे अनिल यास भोंदूबाबा शिवाप्रकाश यांच्याकडे उपचारासाठी घेवून गेले. त्यावेळी भोंदूबाबाने ‘तुम्हाला सासरच्या मंडळींनी दिवाळीच्या काळात जेवणातून काहीतरी खाऊ घातले आहे. त्यामुळे तुमचे पोट दुखत आहे’, असे सांगितले. त्यांना लिंबू चौकी देऊन तुम्ही बरे व्हाल असे सांगितले. त्यानंतर या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी गुरूवारी सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे, पोलीस नाईक सुरेश देशमुख, हर्षवर्धन साळवे, मुकूंद शिरसाठ, शैलेश शिंदे त्याच्या मठात रुग्ण म्हणून गेले. गुरूवार असल्यामुळे तेथे मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. भोंदूबाबा प्रत्येकाला धागे, दोरे, लिंबू चौकी, अंगारा देत उदी खावून घ्या. तुम्हाला गुण येईल. पुढच्या गुरूवारी परत या, असे तो रुग्णांना सांगत असे. यावेळी पोलीस नाईक सुरेश देशमुख यांनी या घटनेचे चित्रिकरण केले. हा भोंदूबाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून बुवाबाजी करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे यावेळी दिसून आले, असे फर्यादीत म्हटले आहे.
...तो गयावया करू लागला
पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर तो गयावया करू लागला. ‘माझ्या अंगात येत नाही. मी फक्त उदी देतो, असे म्हणून मला माफ करा’, अशी याचना पोलिसांपुढे करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.