ऊसतोड कामगाराकडून लाच स्वीकारणारा पोलीस जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:04+5:302021-03-18T04:20:04+5:30
सोमनाथ अशोक कुंढारे (वय ३३) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ऊसतोड कामगाराच्या नातेवाईकाचे ...
सोमनाथ अशोक कुंढारे (वय ३३) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ऊसतोड कामगाराच्या नातेवाईकाचे नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अपघाती निधन झाले होते. याबाबत नेवासा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबतचा तपास पोलीस नाईक कुंढारे याच्याकडे होता. कुंढारे याच्याकडे मयताचा शवविच्छेदन अहवाल व पंचनाम्याची प्रत देण्याची मागणी केली होती. हे कागदपत्र देण्यासाठी कुंढारे याने तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार देण्यात आली होती. पथकाने नेवासा पोलीस ठाणे येथे सापळा लावून कुंढारे याला तक्रारदाराकडून १० हजार स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही. पाटील यांच्यासह निरीक्षक चंद्रसेन पालकर, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बाविस्कर, जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, गेल्या अडीच महिन्यात लाचलुचपतच्या नाशिक पथकाने नगर जिल्ह्यात ही तिसरी कारवाई केली आहे.