उसाला ३४०० रूपये भाव मागणा-या राहुरीतील शेतक-यांना पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:55 PM2017-11-30T18:55:58+5:302017-11-30T18:59:23+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
राहुरी : ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा’, उसाला ३४०० रूपये भाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. गुहा येथे नगर-मनमाड महामार्ग अडविण्याचा कार्यकर्त्यांनी अचानक निर्णय घेतला. सकाळी ११ वाजता कार्यकर्त्यांनी गुहा येथे जाऊन ऊस वाहतूक करणारी वाहने पुलावर अडविली. भाव जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही़ आम्हाला अटक करा किंवा भाव जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली़
नगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील प्रकाश सोनटक्के, प्रकाश सैंदाने, तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उसाचा उतारा व भाव यासंदर्भात साखर कारखान्यांशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल़ आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन अधिका-यांनी केले. त्यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. आरपार लढाई असून अटक झाली तरी चालेल, पण आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार, अरूण डौले, भगिरथ पवार, राहुल करपे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, असिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाट, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाही
जिल्हाधिक-यांशी चर्चेस बोलविले जाईल, असे आश्वासन प्रांताधिका-यांनी यापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात ही बैठक तिनदा रद्द करण्यात आली. अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून आम्ही रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने अडविली. साखर कारखानदार व अधिका-यांनी भावाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले नाही. साखर कारखाने भाव जाहीर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.
-रवींद्र मोरे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राहुरी