यात्रेत पोलिसाला मारहाण; जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:28 PM2019-10-14T16:28:28+5:302019-10-14T16:29:48+5:30
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे यांच्या फिर्यादीवरून एकास अटक केली आहे.
नेवासा : तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे यांच्या फिर्यादीवरून एकास अटक केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल इथापे हे रविवारी कुकाणा दूरक्षेत्र येथे ड्युटीवर होते. सायंकाळी बालाजी देडगाव येथील आशिष हिवाळे यांनी इथापे यांनी फोन केला. यात्रेमध्ये काही महिला चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे सांगितले. इतर पोलीस कर्मचारी निवडणुकीमुळे इतरत्र गेले होते. त्यामुळे इथापे हे देडगाव येथे सायंकाळी साडेसात वाजता गेले. त्यांनी हिवाळे यांना भेटून त्या संशयीत महिलांबाबत माहिती घेतली. इथापे यांच्यासह हिवाळे, प्रमोद थोरात, लक्ष्मण सकट हे यात्रेत संशयीत महिलांचा शोध घेत होते. त्यांना दोन महिला संशयीत वाटल्या. त्यामुळे इथापे यांनी एका महिलेस विचारपूस केली. इथापे हे त्या महिलांना नाव, गाव विचारीत होते. त्यावेळी एक इसम तेथे आला. त्याने अर्वाच्य भाषा वापरली. त्यामुळे इथापे यांनी त्यास बाजूला घेतले. त्याने इथापे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी थोरात, हिवाळे यांनी त्या इसमास बाजूला केले. त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात इथापे यांच्या फिर्यादीवरून नरहरी भाउराव मुंगसे यांच्या विरूद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.