पोलिसांनी केला ४० किलोमीटरचा पाठलाग; जामखेडच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 03:51 PM2020-05-24T15:51:18+5:302020-05-24T15:51:55+5:30
दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४० किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुहेरी हत्याकांड झाले होते. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे.
जामखेड : दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्याकांडातील अंतरिम जामिनावर फरार असलेला आरोपी काकासाहेब गर्जे यास पोलिसांनी ४० किलोमीटर पाठलाग करून जातेगाव येथे पकडले. जामखेड शहरात २८ एप्रिल २०१८ रोजी हे दुहेरी हत्याकांड झाले होते. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे.
शहरातील बीड रस्त्यालगत असलेल्या चहाच्या दुकानात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात हे मित्रांसोबत बसले असताना २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी जुन्या भांडणातून गोळ्या झाडून हत्या केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जामखेडचा माजी सरपंच कैलास माने, उल्हास माने, प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन जाधव, बापू काळे, गोविंद गायकवाड, विजय सावंत आदी आरोपी अटक केले आहेत.
जामखेड बाजार समितीचा संचालक असलेला काकासाहेब बबन गर्जे हा हत्याकांडातील पुरवणी यादीतील आरोपी होता. तो फरार होता. सात महिन्यापूर्वी त्याला अंतरिम जामीन नामंजूर झाल्यानंतर तो फरार होता. काकासाहेब गर्जे हा पारगाव (ता.वाशी, जि. उस्मानाबाद) येथे वावरत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना मिळाली होती. त्यानुसार सातव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून त्यांना तीन दिवसांपूर्वीच उस्मानाबादला रवाना केले होते.
तीन दिवसांपासून पोलीस पथक गर्जे याच्यावर नजर ठेवून होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास गर्जे हा पारगाव येथे मोटारसायकलवरून गावात येत होता. त्याचवेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागली. त्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली. पोलीस पथकाने चाळीस किमी पाठलाग करून त्याला अखेर जामखेड तालुक्यातील जातेगाव शिवारात जेरबंद केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक गणेश साने, भरत कांबळे, लहू खरात, अप्पासाहेब कोळेकर, उदय घोडके, आदित्य बेलेकर, रत्नमाला हराळे, सागर जंगम, नमिता पवार, केशव व्हरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.