दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची झडप; एकास पकडले, पाच जणांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 06:24 PM2020-03-25T18:24:07+5:302020-03-25T18:26:05+5:30
साकत फाट्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जामखेड : तालुक्यातील साकत फाट्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जामखेड पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि सर्व पोलीस फौजफाट्यासह गस्त घालत आसताना साकत फाटा येथे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी झुडुपाच्या आड अंधारात लपून बसलेली होती. गस्तीवर असणाºया पोलीस पथकाने झडप घालून आरोपी मोतीराम मुरलीधर टेकाळे यास गावठी रिव्हॉल्व्हर, तलवार, मिरची पूड, कटावणी आदी हत्यारांसह ताब्यात घेतले. तर इतर दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
अटक केलेला आरोपी मोतीराम टेकाळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक केलेल्या आरोपींनी फरार झालेल्या आपल्या साथीदारांचे नावे पोलिसांंना दिले आहेत. त्यामध्ये ऋषिकेश गोवर्धन सानप, अजय भरत सानप, विशाल भाऊसाहेब कुमटकर, सचिन कांबळे, राम सांगळे (सर्व रा. सौताडा, ता. पाटोदा) या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत.