पोलीस हवालदार लाचेच्या जाळ्य़ात
By Admin | Published: January 28, 2015 01:58 PM2015-01-28T13:58:42+5:302015-01-28T13:58:42+5:30
वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे हवालदार संजय रघुनाथ काळे याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
>अहमदनगर : वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे हवालदार संजय रघुनाथ काळे याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कल्याण रोडवरील एका धाब्यावर मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत विभागाने सापळा लावून ही कारवाई केली.
गौण खनिज कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारदारावर कोतवाली पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात टेम्पो चालकास अटक करून टेम्पो कोतवाली पोलीस ठाण्यात लावण्यात आला होता. गुन्हा दाखल न करणे, तसेच ताब्यात घेतलेला टेम्पो सोडून देण्यासाठी काळे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. दहा हजार रुपयांवर तडजोड झाली. पैसे स्वीकारण्यासाठी कल्याण रोडवरील हॉटेल सम्राट धाबा येथे येण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर हॉटेलवर सापळा लावण्यात आला. यावेळी काळे याने तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे, पोलीस निरीक्षक विजय मुतडक, चंद्रशेखर सावंत, वसंत वाव्हळ, सुनील पवार, नितीन दराडे, रवींद्र पांडे, श्रीपादसिंह ठाकूर, एकनाथ आव्हाड, अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)