मालवाहु ट्रक, दुचाकी अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:51 PM2021-03-21T16:51:47+5:302021-03-21T16:52:07+5:30
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले.
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले. एकनाथ रामकृष्ण बर्वे ( ४८ वर्ष ) असे त्यांचे नाव आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शनिवारी ( दि. २० ) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल एकनाथ रामकृष्ण बर्वे हे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून ( एमएच १७, सीबी ८६९७ ) प्रवास करीत असताना तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीकच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने ( केए ३२, सी ५१६६ ) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एकनाथ बर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवत असताना बर्वे यांनी हेल्मेट घातलेले होते, मात्र अपघातात हेल्मेट दूर जावून पडले. या अपघाताची माहिती स्थानिक रहिवाशांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास दिली.
पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर, आण्णासाहेब दातीर सहित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एकनाथ बर्वे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. अपघातास कारणीभूत चालक मालवाहू ट्रक नजीकच रस्त्याच्याकडेला लावून पसार झाला. या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.