पोलीस निरीक्षक बहिरट यांची वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:21+5:302021-06-30T04:14:21+5:30
शिवाजी पवार श्रीरामपूर : ऑक्टोबर २०२०मध्ये श्रीरामपूर शहर परिसरात पकडण्यात आलेल्या ४६ लाख रुपयांच्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधीत तंबाखूच्या ...
शिवाजी पवार
श्रीरामपूर : ऑक्टोबर २०२०मध्ये श्रीरामपूर शहर परिसरात पकडण्यात आलेल्या ४६ लाख रुपयांच्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधीत तंबाखूच्या गुन्ह्यात तपासात त्रुटी ठेवल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची एक वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नुकताच आदेश काढला आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम या गुन्ह्याच्या तपासातील त्रुटींसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. बहिरट यांच्यावरील कारवाईच्या अहवालात ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहराजवळील आठवडी शिवारात एका शेतातील गोदामामध्ये सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा अवैध साठा पोलिसांना मिळून आला होता. तत्कालीन निरीक्षक बहिरट (सध्या नेमणूक पुणे शहर) यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. त्यांनी मात्र या प्रकरणाचा व्यवस्थित तपास न केल्याने हे प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होते. उपअधीक्षक सातव यांना बहिरट यांच्या तपासामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या. यामध्ये पानमसाल्याचा अवैध साठा मिळून आल्यानंतर बहिरट यांनी अन्न, औषध प्रशासनाला तत्काळ माहिती दिली नाही. त्यामुळे जप्त मालाचे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविता आले नाहीत. गुन्ह्यातील आरोप विजय शांतीलाल चोपडा (निमगाव, राहाता) व संतोष ज्ञानदेव डेंगळे (निमगावजाळी, ता. संगमनेर) यांचे मोबाईल लोकेशन घेण्यात आले नाही, अटकेतील आरोपी सलमान तांबोळी (वय ३०, बेलापूर) याने गुन्ह्यातील माल कुठे व कोणाला विकला, याचाही तपास केला गेला नाही. तांबोळी याच्या मोबाईलमधून झालेले कॉल्स व व्हाॅट्सॲप संदेशांची माहिती घेण्यात आली नाही. जप्त करण्यात आलेल्या वाहनाच्या मालकाचा गुन्ह्यात असलेला सहभाग उजेडात येणे गरजेचे होते. मात्र, तेथेही दुर्लक्ष करण्यात आले. आरोपींच्या बँक खात्यांची माहिती घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे जप्ती पंचनाम्यात सरकारी नोकर पंच म्हणून घेण्यात आला नाहीत. यासह आणखी काही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले होते. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत आयुक्त गुप्ता यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली होती. यासंदर्भात गुप्ता यांनी बहिरट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बहिरट यांचा खुलासा मात्र समर्थनीय नसल्याने वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
---------------------
तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका
गुन्ह्याच्या तपासात निरीक्षक बहिरट यांनी आरोपींना फायदा होण्यासाठी जाणीवपूर्वक गंभीर त्रुटी ठेवल्या. पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा आणली. अत्यंत अशोभनीय काम केले, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आला.
--------
‘लोकमत’ बहिरट यांच्याकडील तपास काढला
गुटख्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर याबाबत अन्न, औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रथम वृत्त प्रकाशित करून पोलिसांकडून सुरू असलेला अवैध प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बहिरट यांच्याकडील तपास काढून घेतला होता.
---------