लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:38 AM2020-11-28T11:38:11+5:302020-11-28T11:38:39+5:30
तक्रारदाराकडून तब्बल ८० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना न्यायालयाने २९ ऑक्टोबरदरम्यान पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर: तक्रारदाराकडून तब्बल ८० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना न्यायालयाने २९ ऑक्टोबरदरम्यान पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लाच स्वीकारताना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुणे यांना रंगेहाथ पकडले. त्यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी कामकाज पाहिले.
खुणे यांचा पुणे परिसरातील वाकड येथे बंगला असून तेथेही तपासणी करावयाची आहे तसेच इतर बाबींचीही माहिती द्यायची असल्याने खुणे यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यावेळी न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर उपस्थित होते.