ढोल-ताशांचा गजरात पोलिसांनी केला रिक्षाचालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:58 PM2018-09-15T16:58:27+5:302018-09-15T16:58:46+5:30
वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
अहमदनगर: वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षाचालकांसाठी असलेल्या नियमावलीची शनिवारपासून शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रिक्षाचालकांना खाकी तर मालकांना सफेद (पांढरा) गणवेश परिधान करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच दिले होते. सर्व रिक्षाचालक व मालकांना नोटीस देऊन पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. यामध्ये शासनाने दिलेल्या परवाना कराराप्रमाणेच रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करावी, रिक्षा चालविताना ठरवून दिलेला गणवेशासह बॅच बिल्ला, वाहनाचे कागदपत्र, परवाना सोबत ठेवावा, जादा प्रवासी बसविण्यासाठी रिक्षात स्पिकर, लोखंडी खुर्ची, प्लास्टिक स्टूल ठेवता येणार नाही. तसेच रिक्षाला कंपनीने दिलेले सीट वाढविता येणार नाही. वाहनाची नोंदणी, परवाना व क्रमांक मिळाल्याशिवाय प्रवासी वाहतूक करता येणार नाही. आदी नियमांचे पालन करणा-याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शनिवारी मोरे व त्यांच्या पथकाने रिक्षांची तपासणी केली तेव्हा ६० चालकांनी नियम तोडल्याचे आढळून अल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर नियम पाळणा-यांना वाहतूक शाखेत बोलावून त्यांचा वाद्य वाजवून गौरव करण्यात आला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे परवानाधारक रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्ताव्यस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे वाहनचालक पालन करतात त्यांना पोलीस मदत करतात. मात्र कायदा तोडणा-यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना योग्य सेवा द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.- अविनाश मोरे, शहर वाहतूक निरिक्षक