दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळले; कोपरगावात मद्य विक्रीचे दुकाने बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:52 AM2020-05-05T11:52:45+5:302020-05-05T11:53:53+5:30
कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले.
कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले.
कोपरगाव शहरांतील सर्वच मद्य विक्रीची दुकाने ही बाजारपेठेत आहेत. याच परिसरात जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने आहे. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याची चर्चा करुन तसेच त्यांच्या मार्फत पाहणी करूनच सदरची दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. मात्र तूर्तास ही दुकाने उघडणार नसल्याचे ही तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले.
दरम्यान कोपरगाव शहरात सकाळपासूनच मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडले.