पोलीसांकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:57 PM2019-03-16T16:57:55+5:302019-03-16T16:58:06+5:30
माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर शेतकरी आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़
अहमदनगर: माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर शेतकरी आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी गडाख यांच्या नगर येथील घराची झडती घेतली़ शंकरराव मात्र घरात मिळून आले नाहीत़
नेवासा तालुक्यातील वडाळा येथे शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते़ याप्रकरणी गडाख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल आहे़ हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे़ गडाख हे सुनावणीला हजर राहत नसल्याने न्यायालयाने गडाख यांचे अटक वॉरंट काढले आहे़ तसेच १६ मार्च रोजी गडाख यांना हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते़ पोलिसांनी गडाख यांचा सोनई व नगर येथील त्यांच्या घरी शोध घेतला़ नगर येथील गडाखांच्या घराची पोलीसांनी झडतीही घेतली़ शंकरराव गडाख हे पुणे येथे गेले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांना सांगितले़ न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी पोलिसांनी माजी आमदार गडाख मिळाले नसल्याचा अहवाल दिला आहे.