रेशनिंगच्या धान्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:00+5:302021-05-13T04:21:00+5:30
राजूर येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडे ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या (एमएच- ०४, ईवाय- ५२९१) वाहनामध्ये ५० किलो वजनाच्या २१८ बॅग ...
राजूर येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडे ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या (एमएच- ०४, ईवाय- ५२९१) वाहनामध्ये ५० किलो वजनाच्या २१८ बॅग धान्य, एमएच-१५, एफव्ही-९०५७ मध्ये १४९ बॅग, एमएच-१७, एजी-३८८३ मध्ये २०६ बॅग आणि एमएच-१७, टी-२९०० मध्ये २०३ बॅग धान्य, असे धान्य ट्रकमधून नेले जात होते. राजूर येथे नाकाबंदी सुरू असल्याने राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी या वाहनांची चौकशी केली.
त्यामध्ये रेशनिंगचा माल आढळून आला. माल अधिकृत असला तरी पोहोच करणारी वाहने अधिकृत परवानाधारक नसल्याचे पोलिसांना आढळून आले. धान्य ताब्यात दिलेल्या पावत्यांवर संबंधित गोडाऊन कीपरच्या सह्या नव्हत्या. त्यामुळे ही चारही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. याबाबत साबळे यांनी तहसीलदारांना माहिती दिली. यानंतर पुरवठा निरीक्षक राकेश रावते हे राजूर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी चौकशी केली. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या वाहनांवर पुढील सूचनांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
..............
चौकशी होऊन गरिबाच्या ताटातील अन्न इतरत्र जात असेल, तर चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हा पुरवठा विभागाने या अनागोंदी कारभारास आळा घालावा. आदिवासी भागात खाण्यासाठी अन्न मिळत नाही. खावटी नाही. रोजगार नाही. त्यात जर असे धान्य कोणतेही सरकारी निर्बंध न पाळता नेले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. कोणतेही राजकीय दडपण झुगारून न्यायनिवडा करावा.
-वैभव पिचड, माजी आमदार