जेऊर पाटोदा येथे पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:46 AM2020-05-13T10:46:09+5:302020-05-13T10:46:54+5:30
जेऊर पाटोदा येथे मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला. मुलीचे आई, वडील, नवरदेवासह त्याचे आई, वडील अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव : जेऊर पाटोदा येथे मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला. मुलीचे आई, वडील, नवरदेवासह त्याचे आई, वडील अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेऊर पाटोदा (ता़ कोपरगाव) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह मढी बुद्रूक येथील एका तरुणाशी मंगळवारी (दि.१२) घरातच करण्याचे ठरले. यासाठी दोन्ही कडील मोजकीच मंडळी उपस्थित होती. दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या विवाहाची तक्रार केली होती. त्यानुसार शहर ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप काळे, पोलीस पाटील हरीभाऊ केकाण, सरपंच सतीश केकाण यांनी विवाहस्थळी भेट दिली़ पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता या मुलीस १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी एक महिना अवधी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ हा विवाह रोखला़ केकाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे करीत आहेत.