गारखिंडी घाटात पोलिसांचे वाहन दरीत कोसळले; पोलीस निरीक्षकांसह दोन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:25 PM2019-11-06T14:25:07+5:302019-11-06T14:25:44+5:30
पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत.
पारनेर : पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली.
खासदार सुजय विखे हे बुधवारी पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी देण्यासाठी आले होते. त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मांडओहोळ धरणावर नुकसानीची पाहणी केली. यानंतर विखे यांचा ताफा पिंपळगाव रोठा मार्गे अळकुटीकडे चालला होता. याचवेळी विखे यांच्या ताफ्यात असलेली पारनेर पोलिसांचे वाहन गारखिंडी घाटातील वळणावर उलटून दरीत कोसळली. या अपघातात पारनेरचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने यांच्यासह दोन पोलीस जखमी झाले आहेत. घटनास्थळी खासदार सुजय विखे, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सुजीत झावरे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी जखमींना मदत करण्याचे काम सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान जखमी पोलिसांचे नावे समजू शकले नाहीत.