बिनविरोधसाठी थोरातांकडून राजकीय तडजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:38+5:302021-02-10T04:21:38+5:30

अहमदनगर : जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बडे नेते सरसावले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी समर्थकांची मते ...

Political compromise from Thorat for unopposed | बिनविरोधसाठी थोरातांकडून राजकीय तडजोडी

बिनविरोधसाठी थोरातांकडून राजकीय तडजोडी

अहमदनगर : जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी बडे नेते सरसावले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी समर्थकांची मते जाणून घेत कोंडी फोडली. जिल्ह्यातील कोपरपगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा आणि राहुरी तालुक्यातून ‘बिनविरोध’ची वाट मोकळी केली असून, यावर अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांत होईल, असे विश्वासनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी बैठक झाली. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित कोपरगाव, राहुरी, अकोले, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिस्पर्धींची मते थोरात यांनी जाणून घेतली. इच्छुकांची संख्या अधिक असली तरी एकमेकांच्या मदतीने कुणाला कुठल्या मतदारसंघातून पाठविणे शक्य होईल, यावर बराच वेळ बैठकीत चर्चा झाली. कोपरगावमध्ये काळे व कोल्हे यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. परंतु, जिल्हा बँकेत या दोघांनाही बरोबर घेण्याचा थोरात यांचा प्रयत्न आहे. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून कोल्हे यांना, तर शेतीपूरकमधून आशुतोष काळे किंवा महिला राखीवमधून त्यांच्या पत्नी चैताली काळे यांना बिनविरोध करता येईल का याची चाचपणी यावेळी करण्यात आली.

राहुरी तालुक्यातून विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अरुण तनपुरे हे इच्छुक आहेत. त्यांचा बिनविरोधचा मार्ग सुकर करण्यावर प्राथमिक चर्चा झाली. श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाणे व भानुदास मुरकुटे हे बैठकीला उपस्थित होते. मुरकुटे यांनी त्यांचे इतर मतदारसंघांतील अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघांतून करण ससाणे व मुरकुटे यांचे अर्ज आहेत. त्यामुळे ससाणे व मुरकुटे यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर समझोता होतो, याची उत्सुकता आहे. श्रीगोंदा तालुक्यातील माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे हे दोघे बैठकीला हजर होते. हे दोघेही बँकेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जगताप यांना, तर शेतीपूरकमधून नागवडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नगर तालुक्यातून रावसाहेब म्हस्केही बैठकीला हजर होते. जिल्हा बँकेसाठी राहाता, पाथर्डी, जामखेड आणि शेवगाव तालुक्यातून बिनविरोध संचालक झाले आहेत. ‘कर्जत’ची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर आहे. पारनेरमधून आमदार नीलेश लंके व उदय शेळके यापैकी कोण ते अजून ठरलेले नाही. नेवासा तालुक्यातून स्वत: मंत्री शंकरराव गडाख यांचा अर्ज असल्याने तेथील निर्णय गडाखच घेतली. नगर तालुक्यात शिवाजीराव कर्डिले यांच्याविरेाधात महाविकास आघाडी एकवटलेली आहे. कर्डिले यांनी थोरात यांची यापूर्वीच भेट घेतलेली आहे. त्यामुळे नगर तालुक्याचा निर्णय शेवटच्याक्षणी होण्याची शक्यता आहे.

....

जगताप नागवडेंकडून गाठीभेटी सुरू

बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या मोठी आहे. हा मतदारसंघ बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ऐनवळी निवडणुकीला सामोरे जावे लागल्यास जगताप यांनी तयारी सुरू केली आहे.

....

कर्जत, नेवासा, पारनेरबाबत उत्सुकता कायम

कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ, नेवासा तालुक्यातून मंत्री गडाख, विठ्ठलराव लंघे, पारनेरमधून आमदार नीलेश लंके, उदय शेळके, जयश्री विजय औटी यांचे अर्ज आहेत. या तालुक्यातून अद्याप कुणीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील उत्सुकता कायम आहे.

Web Title: Political compromise from Thorat for unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.