पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप चिंताजनक - राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 08:24 PM2018-01-16T20:24:43+5:302018-01-16T20:26:52+5:30
पोलीस यंत्रणेमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चिंताजनक आहे. मूठभर लोकांच्या चुका अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
श्रीरामपूर : पोलीस यंत्रणेमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप चिंताजनक आहे. मूठभर लोकांच्या चुका अडचणी निर्माण करीत आहेत. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सामान्य जनतेशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. त्यातूनच सामाजिक सलोखा टिकून राहील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.
दिवंगत बाळासाहेब विखे यांनी चांगले काम करणा-या प्रशासनातील अधिका-यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. बेलापूर खुर्द येथील कार्यकर्ते हाच वारसा जोपासत असल्याने समाधानी आहोत, असेही ते म्हणाले. बाळासाहेब विखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बेलापूरच्या केशव गोविंद बनात प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकानाथ बडधे होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती नानासाहेब पवार, केशव गोविंद ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी, बाळकृष्ण कोळसे, सुधीर नवले, मुळा-प्रवराचे उपाध्यक्ष जी. के. बकाल, सुनील मुथ्था, सरपंच अनुराधा गाढे, उपसरपंच सविता राजुळे उपस्थित होते.
पोलीस प्रशासनातील अधिका-यांचा सन्मान हा त्यांचे आत्मबल वाढविणारा आहे. पोलिसांप्रती जनतेच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. सर्वांनी एक विचाराने काम करावे. उद्योजकांनी अडीअडचणींवर मात करत यश मिळविले. त्यातून चांगली रोजगारनिर्मिती झाली. येथील वातावरण चांगले ठेवण्यात पोलीस व उद्योजक दोघेही महत्त्वाची भूमिका अदा करतात असे ते म्हणाले.
पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक अन्सार शेख, प्रभात उद्योग समुहाचे सारंगधर निर्मळ, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, डॉ.बाळासाहेब बारहाते, उद्योजक सतीश भगत, अशोक भगत यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. आमदार कांबळे, उपअधीक्षक जगताप, सुनील मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले.