अचूक मतदारयादीसाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य आवश्यक : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:19 PM2018-07-21T17:19:08+5:302018-07-21T17:19:22+5:30
नवीन मतदार नावनोंदणी वाढविणे आणि बिनचूक अद्ययावत मतदार याद्या तयार करण्यासाठी राजकीय पक्षांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
अहमदनगर : नवीन मतदार नावनोंदणी वाढविणे आणि बिनचूक अद्ययावत मतदार याद्या तयार करण्यासाठी राजकीय पक्षांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी १ जानेवारी २०१९ वर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत विविध राजकीय पक्ष, तसेच जिल्हास्तरीय स्वीप समिती सदस्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील, नगर तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांच्यासह स्वीप समितीचे सदस्य, राजकीय पक्षप्रतिनिधी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक यंत्रणेप्रमाणेच राजकीय पक्षांनीही निवडणूक यादी अद्ययावत कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. याबाबतीत अधिकाधिक जनजागृती करून नवीन मतदारांची नोंदणी, तसेच दुबार नोंद असलेल्या, मयत आणि स्थलांतरित मतदारांची वगळणी करण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रारूप मतदारयादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यावर आलेल्या हरकती ३० नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील. त्यानंतर डाटा बेसचे अद्यावतीकरण करून ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
दिव्यांग नोंदणीत लक्ष घाला
दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नावे चिन्हांकित करण्यासाठी ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची नोंदणी होते किंवा त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना राबविल्या जातात, त्यांच्याकडून माहिती घेऊन मतदारसंघनिहाय त्यांची नोंदणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांगांसाठी काम करणाºया संस्थांनीही पुढाकार घेऊन अशी नोंदणी होईल, हे पाहावे, अशा सूचना द्विवेदी यांनी केल्या.