छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ: पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 22:56 IST2025-01-29T22:55:46+5:302025-01-29T22:56:54+5:30
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थाटात शुभारंभ

छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ: पोपटराव पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये भव्यदिव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ मिळाले आहे, असे गौरवोदगार पद्मश्री पोपटरावर पवार यांनी बुधवारी येथे काढले.
येथील वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आयुक्त यशवंत डांगे, गणेश भोसले, संपत बारस्कर, अभय आगरकर, भैय्या गंधे, अनिल शिंदे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, हिंदकेसरी योगेश दोडके, संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, अशोक शिर्के, दिनेश गुंड, संतोष भुजबळ, संजय शेंडगे, मनोज कोतकर, अविनाश घुले, अनिल गुंजाळ, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, रविंद्र बारस्कर आदी उपस्थित होते.
पद्मश्री पवार पुढे म्हणाले, लाल मातीने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. लाल मातीचे संस्कार खूप मोठे आहेत. ही स्पर्धा उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. तरुणी पिढीला पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, कुस्ती स्पर्धेतील पहिला क्रमांक पटकाविणाऱ्याला शासकीय नोकरी मिळते. मात्र दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंनादेखील शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ॲड. अभय आगरकर, भैय्या गंधे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उध्दव काळापाहाड यांनी केले, तर आभार माजी नगरसेवक शिवाजी चव्हाण यांनी मानले.
दानशूरांनी मल्लांना दत्तक घ्यावे
ग्रामीण भागात तरुणांना कुस्ती या खेळाविषयी आकर्षण आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी सामुहीक प्रयत्न करण्याची गरज असून, दानशूरांनी मल्ल दत्तक घेतल्यास मल्लांना मोलाची मदत तर होईल. पण जिल्ह्याचे नाव देश पातळीवर जाईल, असे जगताप म्हणाले.
महायुतीच्या नेत्यांची हजेरी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली. महायुतीच्या नेत्यांच्या हस्ते विविध गटातील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
वाडिपार्कचा कायपालट करण्याचा संकल्प
जिल्हाधिकारी सिध्दााराम सालीमठ यांनी वाडियापार्क मैदानाचा कायापालट करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
विजेत्यांना चांदीची गदा, थार, बोल्हेरा, दुचाकी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्या मल्लांना १२ किलो चांदीची गदा, थार, बोलेरो आणि दोन दुचाकी, अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.