सरपंच आरक्षणानंतरच्या राजकारणाने गावकारभाऱ्यांची धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:27 AM2021-02-05T06:27:32+5:302021-02-05T06:27:32+5:30
सुपा : येत्या दोन ते तीन दिवसांनी गावोगावच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यामुळे आपल्या गावचा कारभारी ...
सुपा : येत्या दोन ते तीन दिवसांनी गावोगावच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यामुळे आपल्या गावचा कारभारी कोण असेल या विचाराने कार्यकर्ते हैराण आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील काठावर बहुमत असणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच निवडताना फाटाफुटीच्या शक्यतेने पॅनल प्रमुखांच्या (गावकारभारी) मनातील धाकधूक वाढली आहे. यामुळे बहुमताच्या काठावरील गावात अपक्षांचा भाव वधारणार आहे.
आरक्षण निश्चित झाल्यावर सरपंच-उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. सरपंचपदाची निवड आरक्षणानंतर किती दिवसांनी होईल यावर काहींची राजकीय खेळी अवलंबून आहे. यामध्ये थोडा अवधी असेल तर सदस्यांची पळवापळवी होऊ शकते. अशावेळी सदस्यांना सहलीचा आनंद घेण्यासाठी वाव आहे. सत्तेसाठी या सदस्यांना अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्ते नियोजन करण्याच्या विचारात दिसतात.
मागच्या वेळी जनतेतून निवडला जाणारा सरपंच यावेळी आरक्षण व नंतर बहुमत या निकषावर अवलंबून आहे. त्यामुळे गावातील निवडून आलेल्या सदस्यांच्या मंडळातील कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. एक तर निवडणुकीपूर्वी आरक्षण असते तर सरपंचपदाचा दावेदार निश्चित झाला असता व त्यांच्याच खांद्यावर निवडणूक यंत्रणा, प्रचारखर्च आदी जबाबदाऱ्या दिल्या असत्या. आता आरक्षण निघेल व मग बहुमताच्या जोरावर सरपंच निवडला जाईल.
वाघुंडे खुर्दमध्ये ३ व ४ सदस्य वेगवेगळ्या गटातून निवडले गेल्याने बहुमतासाठी गडबडीला वाव आहे. तशीच काहीशी स्थिती वाघुंडे बुद्रूकमध्ये आहे. सत्ताधाऱ्यांना दूर करीत वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार हा औत्सुक्याचा विषय आहे पळवे खुर्दमध्ये काठावरील बहुमतासाठी सत्तारूढ गटाकडे ५ तर विरोधी गटाकडे ४ सदस्य असल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते.
हंगा व भोयरे गांगर्ड या गावात आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक झाल्याने तेथील सरपंच व उपसरपंच कोण होणार हेही जवळपास निश्चित आहे.
-----
सुप्यातही दोन्ही गटात खलबते..
सुप्यात सत्ताधारी गटाने ८ जागा जिंकून बहुमताची रेखा पार केली असली तरी विरोधी गटाकडे ६ व एक अपक्ष असा आकडेवारीचा खेळ आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण निघाले की जुळवाजुळवीला वाव आहे. त्यामुळे सध्या तरी वरवर शांतता दिसत असली तरी अंतर्गत वातावरणात भविष्याचा वेध घेताना कुणाला बहुमतासाठी जवळ करावे लागेल याचे अंदाज बांधले जात आहेत.