माघारीसाठी रंगलयं तडजोडीचं राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:38 AM2021-02-06T04:38:46+5:302021-02-06T04:38:46+5:30
अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे पाच दिवस राहिले आहेत. विकास सेवा सहकारी संस्था वगळता इतर ...
अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे पाच दिवस राहिले आहेत. विकास सेवा सहकारी संस्था वगळता इतर मतदारसंघात दाखल झालेले अर्ज माघारीसाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. पक्षीय भूमिका गुंडाळून ठेवत बिनविरोधसाठी जिल्ह्यातील नेते सरसावले असून, तडजोडीचे राजकारण रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांतून प्रत्येकी एक, याप्रमाणे १४ संचालक निवडले जाणार आहे. विकास सेवा सहकारी संस्थांमधून सर्वच तालुक्यांतील बडे नेते निवडणूक मैदानात आहेत. तालुक्यातील प्रमुख नेते आपआपले गड राखून आहेत. उर्वरित सात जागांवरच जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित अवलंबून असते. श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटे यांनी शेती पूरक व बिगर शेती मतदारसंघातून दाखल केलेले अर्ज शुक्रवारी मागे घेतले. शेती पूरकमधून एकूण ३६ अर्ज दाखल झालेले आहेत. बिगर शेतीमधून सर्वाधिक ५० अर्ज आहेत. इतर मागास प्रवर्गातून ४६ अर्ज दाखल झालेले आहेत. महिला राखीवमधून ४६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून १२, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून १८ जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. अनुसूचित जाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून बिनविरोधसाठी चर्चा सुरू आहे. उर्वरित शेती पूरक, इतर मागास प्रवर्ग आणि बिगर शेती मतदारसंघातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या जागाही बिनविरोध करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी वाटाघाटींना सुरुवात झाली असून, आणखी किती संचालक बिनविरोध होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
...
उमेदवार नॉट रिचेबल
काही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झालेले आहेत. माघारीसाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. मात्र अनेकांनी फोन बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने धावपळ सुरू आहे. त्यात बिनविरोधसाठी केलेल्या मेहनतीवर यामुळे पाणी फिरण्याची शक्यता आहे.