दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही-सुरेश धस; बोधेगावला राजळेंच्या प्रचारार्थ सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 05:07 PM2019-10-16T17:07:43+5:302019-10-16T17:08:15+5:30
विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, पारदर्शी कारभार करून शेतक-यांना पाठबळ दिले. केवळ दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली.
बोधेगाव : विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, पारदर्शी कारभार करून शेतक-यांना पाठबळ दिले. केवळ दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथे मंगळवारी भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, माणिकराव खेडकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, विनोद मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भीमराव फुंदे, चंद्रकांत गरड, विश्वनाथ घोरतळे आदी उपस्थित होते.
..तो तर आमचा जुना गडी!
मला या व्यासपीठावर नितीनराव दिसत नाहीत. तो तर आमचा जुना गडी आहे, पण अजूनही पक्षातच आहे. काही गैरसमज झाले असतील तर दूर करू. कारण आपली भगिनी अडचणीत आहे. तिला साथ दिली पाहिजे, असे नितीन काकडे यांचे नाव न घेता धस यांनी म्हणताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.