भिडे यांच्या रुपाने द्वेषाचे राजकारण, प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:43 AM2018-04-02T04:43:50+5:302018-04-02T04:44:09+5:30
संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
तिसगाव (जि. अहमदनगर) - संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.
श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी राज्यस्तरीय भटक्या विमुक्तांच्या चिंतन परिषदेच्या समारोप झाला. आंबेडकर अध्यक्षस्थानी होते. विधिज्ञ विजय मोरे व मानवेंद्र वैदू, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, स्मिता पानसरे आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, पक्षांतर्गत हुकुमशाही घातक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला केला. सध्याच्या समाजव्यवस्थेत एकमेकांबद्दल गैरसमज व संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. त्याचा मुकाबलाही आता एकत्रितपणे करावा लागेल. सध्या प्रस्थापित भाजपाचा एक मार्ग, तर बाबासाहेबांच्या विचारांचा दुसरा मार्ग समोर आहे. चौरस्त्यावर थांबण्याचा व थांबणाऱ्यांचा काळ आता संपला आहे. राजेशाहीत भटक्या विमुक्तांना स्थान नव्हते. लोकशाहीत ते स्थान बाबासाहेबांचे विचार व संविधानाने दिले. त्याअनुरूप न्याय व हक्क मिळण्यासाठी राज्याच्या व्यवस्थेचा भाग बनणे हाच चळवळीचा एकमेव अजेंडा आता असला पाहिजे. सत्तेचा हिस्सा होण्यासाठी २८८ जागा मिळविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक वर्षी मढी यात्रेनंतर राज्यातील भटक्या विमुक्तांची परिषद मढी येथील कानिफनाथांच्या भूमीत घेतली जाईल, असे संयोजक प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले.