योग्य फवारण्यांतून डाळिंबावरील तेल्यावर नियंत्रण शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:31+5:302021-06-30T04:14:31+5:30

: राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी तालुक्यांत डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यादृष्टीने तेल्याग्रस्त डाळिंब बागांमध्ये राष्ट्रीय ...

Pomegranate oil can be controlled with proper spraying | योग्य फवारण्यांतून डाळिंबावरील तेल्यावर नियंत्रण शक्य

योग्य फवारण्यांतून डाळिंबावरील तेल्यावर नियंत्रण शक्य

: राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी तालुक्यांत डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यादृष्टीने तेल्याग्रस्त डाळिंब बागांमध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील शास्त्रज्ञांनी पिंपरी निर्मळ या गावात शिवार फेरीचे आयोजन केले होते.

यामध्ये गावातील डाळिंब उत्पादक दादासाहेब बजरंग आहेर, डाॅ. दिलीप निर्मळ, संदीप निर्मळ यांच्या समवेत इतर डाळिंबाच्या बागांची पाहणी करण्यात आली. प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. ज्योत्सना शर्मा, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील उद्यान विद्या विभागाचे डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, पीक संरक्षण विभागाचे भरत दवंगे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. डाळिंब उत्पादकांना तातडीने करावयाची उपाययोजनांसंबंधी माहिती देण्यात आली. पाहणीदरम्यान डॉ. ज्योत्सना शर्मा म्हणाल्या की, बहुतांश बागांमधे पीक पोषणाचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने पीक संरक्षणाच्या उपाययोजना केल्यामुळे तेल्या आणि करपा रोगासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, शिफारशींप्रमाणे डाळिंबाचे पीक पोषण आणि जीवाणूनाशक औषधांच्या फवारण्या केल्यास तेल्या रोगावर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

तेल्यासाठी फवारण्या करताना फळे लिंबाच्या किंवा पेरू आकाराची असताना तेलकट डागांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येताच ५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या घ्याव्यात. फळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशकांमधे बदल करून फवारण्या कराव्यात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी तेल्या, करपा आणि फळावरील डाग या समस्या येऊ नये यासाठी तत्पर राहून आपले झाड निरोगी कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे डाॅ. पुरुषोत्तम हेंद्रे यांनी सांगितले. दवंगे यांनी सांगितले की, छाटणी केलेल्या डाळिंब बागेतील रोगट पाने, फुले, फळांचे अवशेष बागेत साचू देऊ नयेत. छाटणीनंतर संपूर्ण बागेत १ टक्का मोडो मिश्रणाची फवारणी करावी, बागेत प्रत्येक झाडास पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर जास्तीत जास्त करावा. त्यासोबत सुडोमोनास फ्ल्युरोसंटस आणि बॅसिलस सबटिलिस या जिवाणूंचा २ लीटर प्रतिएकर या प्रमाणात वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pomegranate oil can be controlled with proper spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.