डाळिंबप्रश्नी केंद्राचे लक्ष वेधणार
By Admin | Published: September 6, 2014 11:46 PM2014-09-06T23:46:01+5:302023-06-26T16:58:20+5:30
डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.
राहाता : राज्यात डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या समस्यांबाबत आणि निर्यातीच्या प्रश्नासंदर्भात डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांंची भेट घेणार असून राज्यातील बाजार समित्यांनीही डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.
राज्यातील डाळिंब उत्पादकांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांसर्भात विचारविनियम करण्यासाठी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील डाळिंब उत्पादक, निर्यातदार, व्यापारी आणि कृषी व पणन विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक विखे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत डाळिंब उत्पादक, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीचे उपाय म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्यावर सोपविण्यात आली.
शेतीमालाचे नुकसान होणार नाही याकरीता बाजार समित्यांनी गरजेप्रमाणे तातडीने शेड उभारावेत आणि रविवार सोडून सर्व बाजार समित्यांच्या सुट्या रद्द करण्यात याव्यात अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यास बाजार समितीलाच जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी होण्यासाठी दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले. राज्यात उभ्या असलेल्या प्रक्रिया प्रकल्प चालकांशी तातडीने चर्चा करून डाळिंबापासून उपपदार्थ निर्मितीबाबत कसे धोरण आखता येईल. याबाबत बुधवारी पुणे येथे सर्व प्रक्रिया उद्योजकांची बैठक घेण्याचेही विखे यांनी सूचित केले. निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शासनाकडून पुरविण्याबाबत सकारात्मकता राहिल, असे सांगून निर्यातीसाठी रेफ्रिजरेटर पद्धतीचे कंटेनर पणन मंडळाकडून उपलब्ध व्हावेत, यासाठी कंटेनर कार्पोरेशनशी संपर्क साधून याबाबत अनुदान देण्याबाबतही विचार करू, अशी ग्वाही विखे यांनी डाळिंब उत्पादक व निर्यातदार यांना दिली.
कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी डाळिंब उत्पादनाबाबतचा आढावा घेतला. निर्यातदार संजय पानसरे, अभिजीत बसाळे, प्रमोद देशमुख, तानाजी चौधरी यांच्यासह डाळिंब उत्पादकांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला अण्णासाहेब म्हस्के, दिलीप बनकर, विश्वासराव भोसले, मिलिंद आकरे, भाऊसाहेब कडू आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)