पूजा खेडकर यांच्या जिल्हा रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याचा धोका
By अण्णा नवथर | Published: July 14, 2024 11:49 AM2024-07-14T11:49:37+5:302024-07-14T11:50:26+5:30
रुग्णालयातील रेकॉर्डरूम सरकारने सील करण्याची आवश्यकता आहे.
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. तशी नोंद रेकॉर्डरुममध्ये सापडली आहेत. पूजा खेडकरसह इतर अनेकांना या रुग्णालयातूनचं बोगस प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. तर काही प्रमाणपत्रांंच्या फॉरमॅटबद्दल संशय आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाची रेकॉर्डरूम येथील अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून बदले गेलेले नाहीत. त्यामुळे पूजा खेडकर सह इतर कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असून रुग्णालयातील रेकॉर्डरूम सरकारने सील करण्याची आवश्यकता आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना 2018 आणि 2020 या दोन वर्षांमध्ये दिव्यांगाची वेगवेगळे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. तशी माहिती जिल्हा व शल्य चिकित्सक घोगरे यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी दिले. तशी नोंद रेकॉर्ड रूममधील रजिस्टरमध्ये सापडली आहे. हे सर्व अभिलेख जिल्हा रुग्णालयातील रॉकार्ड रूम मध्ये आहेत. ही रुम सध्या जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले गेल्याची समोर आलेले आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले तर काही वेळा डमी उमेदवार उभे करूनही प्रमाणपत्र वाटलेले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.
जिल्हा रुग्णालयातील कारभाराकडे आरोग्य मंत्री तसेच आरोग्य मंत्रालय यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून खेडकर यांच्यासह घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतो. बोगस प्रमाणपत्र दिल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मध्यंतरी शिक्षकांनाही चुकीच्या पद्धतीने दिव्यांगांची प्रमाणपत्र दिले गेले आहेत. या प्रकरणाची ही चौकशी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील बोगस प्रमाणपत्रांबाबतच्या आजवरच्या तक्रारी पाहता वादग्रस्त आयएएस अधिकारी खेडकर यांच्या कागदपत्रांमध्ये फेरबदल केले जाऊ शकतात. त्यामुळे हा विभाग राज्य सरकारने ताब्यात घेऊन सील करण्याचे आवश्यकता आहे.