पूजा खेडकर दिव्यांगच नाहीत ! पिंपरीचे प्रमाणपत्र सुधारित; एकाच व्यक्तीने दोन प्रमाणपत्रे काढणे गैर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:34 AM2024-07-17T04:34:15+5:302024-07-17T04:34:40+5:30
दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची नियमावली आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार २ ऑक्टोबर २०१८ पासून दिव्यांग प्रमाणपत्रे ‘स्वावलंबन कार्ड’ या संगणकीय प्रणालीद्वारेच वितरित करावयाची आहेत.
अहमदनगर : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी नावे बदलून पुणे व अहमदनगर येथून वेगवेगळी दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यांगांसाठीचा ‘यूडीआयडी’ क्रमांक देशभर एकच असताना दोन रुग्णालयांतून वेगवेगळी प्रमाणपत्रे काढणे ही बाबच नियमबाह्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची नियमावली आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार २ ऑक्टोबर २०१८ पासून दिव्यांग प्रमाणपत्रे ‘स्वावलंबन कार्ड’ या संगणकीय प्रणालीद्वारेच वितरित करावयाची आहेत. प्रत्येक दिव्यांगाला स्वतंत्र ‘यूडीआयडी’ क्रमांक दिला जातो. हा क्रमांक म्हणजे त्या व्यक्तीची देशात दिव्यांग म्हणून असलेली ओळख आहे.
पूजा यांना नगर जिल्हा रुग्णालयाने १९ जानेवारी २०२१ रोजी दिव्यांग प्रमाणपत्र दिले. त्यावेळीच त्यांचा हा ‘यूडीआयडी’ निश्चित झाला. त्यामुळे त्यांना पिंपरी येथील रुग्णालयातून प्रमाणपत्र काढता येऊ शकत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
केवळ ७ टक्के दिव्यांग
nपूजा यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमधून २३ ऑगस्ट २०२२ रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले. त्यानुसार त्या केवळ ७ टक्के दिव्यांग असून, त्या दिव्यांग प्रवर्गातच मोडत नाहीत.
nदिव्यांग आरक्षणासाठी ४० टक्के दिव्यांगपण हवे असते. पिंपरी रुग्णालयाचे प्रमाणपत्र शासनाच्या संकेतस्थळावर दिसत आहे. ते नवीन तारखेचे असल्याने तेच प्रमाणपत्र ग्राह्य मानावे लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
यूडीआयडी पद्धतीलाच आव्हान
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विकसित केलेल्या ‘यूडीआयडी’ क्रमांक पद्धतीनुसार दिव्यांग व्यक्ती कोणत्याही रुग्णालयात गेली तरी तिचे पूर्वीचे प्रमाणपत्र ऑनलाइन दिसते.
एका व्यक्तीला दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे मिळू शकत नाहीत. पूजा यांनी दोन वेगवेगळी प्रमाणपत्रे घेतल्याने या ऑनलाइन प्रणालीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी
पूजा यांचे वडील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांची अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. येथील कार्यालयाने या बाबीस दुजोरा दिला. ही चौकशी किती वर्षांपूर्वी सुरू झाली व ती कोणत्या अवस्थेत आहे, हा तपशील समजू शकला नाही.
पूजा खेडकर यांनी नगरच्या रुग्णालयातून १९ जानेवारी २०२१ रोजी प्रमाणपत्र मिळवले. त्यावेळी त्यांना यूडीआयडी क्रमांक मिळालेला असताना त्यांना पिंपरीच्या रुग्णालयातून पुन्हा प्रमाणपत्र कसे मिळाले, हा प्रश्नच आहे. नाव बदलून प्रमाणपत्र काढले व पूर्वी तपासणी झाली ही बाब अंधारात ठेवली, तर असे होऊ शकते.
- डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर
पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
पुणे : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा व्हिडीओ ताजा असतानाच आता दोन वर्षांपूर्वी पोलिसांशी हुज्जत घालतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना २०२२ मधली आहे. बाणेर भागात खेडकर कुटुंबीयांचा ओम दीप बंगला आहे. बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर मेट्रोच्या कामासाठी लागणारे साहित्य ठेवले होते. त्यामुळे मनोरमा यांनी मेट्रोच्या कर्मचाऱ्याशी वाद घातला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.