पूजा खेडकर यांना दोनदा मिळाले दिव्यांग प्रमाणपत्र; नगर जिल्हा रुग्णालयात सापडली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:07 AM2024-07-14T10:07:59+5:302024-07-14T10:08:12+5:30
अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
अहमदनगर : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
खेडकर यांच्या कारनाम्यांची नवनवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येत आहे. त्यांना नगर जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील जावक नोंद वहीमध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र दिल्याची नोंद होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता २०१८ मध्ये ‘नेत्र दिव्यांग’ व २०२० मध्ये ‘मानसिक आजारी’ असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची नोंद आढली आहे. वैद्यकीय मंडळाने २०२१ मध्ये प्रमाणपत्र दिल्याचे अभिलेखानुसार आढळले आहे, असे डॉ. घोगरे यांनी सांगितले. वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे त्यांना ही प्रमाणपत्रे दिली त्या कागदपत्रांचा शोध सुरू आहे.
‘नॉन क्रीमिलेअर’ही संशयाच्या फेऱ्यात
खेडकर यांच्या ‘दिव्यांग’ प्रमाणपत्रासोबतच ‘नॉन क्रीमिलेअर’ हे प्रमाणपत्रदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. त्यांनी एका मुलाखतीत आपले आई-वडील विभक्त असल्याचा दावा केला होता; परंतु, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.
दीड किलो चांदी अर्पण
अहमदनगर : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी नगर जिल्ह्यात मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस केला होता. पण त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही.
बीड लोकसभा मतदारसंघातून मुंडे यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी दिलीप खेडकर व त्यांचे भाऊ माणिक खेडकर यांनी पंकजा मुंडे यांची मोहटादेवी गडावर पेढे तुला केली. तसेच त्यांच्या हस्ते दीड किलो चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला.
पूजा यांच्या मातोश्री मनोरमा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहिलेला १२ लाख १२ हजारांच्या धनादेशाची कॉपी व्हायरल झाली आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.